प्रियांका चतुर्वेदींची काँग्रेसला सोडचिठ्ठी : शिवसेनेत केला प्रवेश

0
नवी दिल्ली :  काँग्रेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी चतुर्वेदींशी गैरवर्तणूक केली, परंतु या गंभीर प्रकरणाची पक्षानं दखल घेतली नसल्याचा आरोप प्रियांकांनी केला आहे. यानंतर दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियांका यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून चतुर्वेदींनी काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. जड अंत:करणानं हा निर्मय आपण घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. दहा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये युवक काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला होता. सर्वसमावेशक, मुक्त व पुरोगामी अशा काँग्रेसच्या आदर्शांवर माझा विश्वास होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

“पक्षाची सेवा करताना मला, माझ्या कुटुंबीयांना व मुलांना किती धमक्या आल्या, किती शिवीगाळ झाली याची तुम्हाला आठवण करून द्यायला नकोच. माझ्या आकांक्षाना काँग्रेस पक्ष योग्य वाव देईल या अपेक्षेमुळे मी कधीही काही मागितलं नाही,” प्रियाकांनी नमूद केलं. परंतु त्यांच्याशी झालेल्या गैरवर्तणुकीची दखल पक्षानं घेतली नसल्याची बोच मात्र चतुर्वेदींनी व्यक्त केली आहे.

मला खेद वाटतो की काँग्रेस पक्ष महिलांची सुरक्षा, सन्मान व सबलीकरणाला प्राधान्य देतो, परंतु ते कृतीत मात्र दिसलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पक्षाचं काम करत असताना काही ज्येष्ठ नेते अत्यंत असभ्यपणे माझ्याशी वागले परंतु त्यांच्या या अक्षम्य दुर्वतनाकडे निवडणुकीची गरज म्हणून दुर्लक्ष करण्यात आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मला काँग्रेसच्या पलीकडे बघण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संपूर्ण देश तीन दिवस माझ्या मागे असून मी प्रत्येकापोटी कृतज्ञ असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. काँग्रेसच्या मीडियाच्या सगळ्या व्हॉट्स अॅप ग्रुपमधून चतुर्वेदी बाहेर पडल्या आहेत, तसेच त्यांनी त्यांच्या ट्विटरवरील काँग्रेसचे पददेखील हटवले आहे. चतुर्वेदींनी काँग्रेसच्या नेत्यांकडे राजीनामा सोपवला आहे.

LEAVE A REPLY

*