कुपोषित बालकांच्या ऐवजी यंत्रणेचे पोषण करणारा आहार

0

जळगाव :  कुपोषण निर्मुलनासाठी, बालमृत्यू रोखण्यासाठी पुरक पोषक आहार दिला जातो. जळगाव जिल्ह्यातही कुपोषणाचा प्रश्‍न गंभीर आहे. यासाठी मागील वर्षी १८ कोटी ३८ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र ९५५ कुपोषित बालकांच्या वजनात किंवा श्रेणीत बदल न झाल्यामुळे योजना राबविणार्‍या यंत्रणेवरच साशंकता निर्माण होत आहे. परिणामी पुरक पोषक आहारच ‘कु’पोषण आहे की काय? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

देशभरात कुपोषणाचे प्रमाण भयावह आहे. त्यामुळे बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आदिवासी, दुर्गम भागात तर चिंताजनक बाब आहे. त्यामुळे कुपोषण निर्मुलनासह बालमृत्यू रोखण्यासाठी आहार योजना राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने शासनाने मंजुर केलेल्या निविदाधारक मक्तेदारांच्या यंत्रणेमार्फत घरी जावून पुरक पोषक आहार (टीएचआर) दिला जातो. तर महिला बचत गटाच्या माध्यमातून गरम ताजा आहार दिला जातो.

त्यासाठी मागील वर्षी जिल्ह्यात १८ कोटी ३८ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. पुरक पोषण आहारावर कोट्यावधी रुपये खर्च करुनही जिल्ह्यात कुपोषणाचे तांडव सुरुच आहे. जिल्ह्यातील ९५५ कुपोषित बालकांच्या वजनात वाढ झालेली नाही. परिणामी ६०९ बालकांचा मृत्यू झाला.

त्यामुळे कुपोषित बालकांऐवजी शासनाच्या योजना राबविणार्‍या ‘यंत्रणे’लाच शासनाने ‘पोषक’ केले की काय? असे वाटू लागले आहे.

योजनांच्या अंमलबजावणीचा अभाव

कुपोषण निर्मुलनासाठी पुरक पोषक आहार देण्याची योजना राबविली जात आहे. कुपोषित बालकांना किमान दोन वर्ष किंवा १ हजार दिवस सकस आहार दिल्यास शारीरिक व बौद्धिक वाढ होऊ शकते. कुपोषण निर्मुलनासाठी शासनाची ही अत्यंत प्रभावी योजना आहे.

मात्र या योजनांची यंत्रणेमार्फत प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. जळगाव जिल्ह्यात कोट्यावधी रुपये खर्च केल्याची जिल्हा परिषद विभागाकडे कागदोपत्री नोंद आहे. मात्र कोट्यावधी रुपये खर्च करुन एकाही कुपोषित बालकांच्या वजनात वाढ झाली नसल्याने यंत्रणेमार्फत योजनांची अंमलजावणी होत नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.

दरमहा सव्वा कोटी रुपये खर्च

जळगाव जिल्ह्यात पुरक पोषक आहार योजनेवर दरमहा १ कोटी ३० लाख रुपये खर्च केला जातो.  मागील वर्षी खर्च झालेल्या १८ कोटी ३८ हजारातून केवळ ३ लाक ४७ हजार २६२ रुपये शिल्लक राहीले आहे. तर यावर्षी पुन्हा २ कोटी ७९ लाख ९८ हजाराचे अनुदान प्राप्त झाले आहे.

कोट्यावधी रुपयाचे खर्च होत असतांना कुपोषणाचे प्रमाण कमी का होत नाही? पुरक पोषक आहार ‘कु’पोषक आहे? की यंत्रणा ‘कु’पोषित आहे? असे नानाविध प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

LEAVE A REPLY

*