जळगाव जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पाऊस

पिंकाचे नुकसान; झाडे उन्मळून पडली; वीज पुरवठा खंडित

0
देशदूत चमुकडून । जळगाव :  गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाचे वादळवार्‍यासह आगमन झाल्याने गुरांचा चारा ओला झाला असून कांदा बियाणे व पिकांचे नुकसान झाले.

अमळनेर येथे संत सखाराम महाराज संस्थानतर्फे द्विशताब्दी समाधी सोहळ्यासाठी बोरी पात्रातील भव्य मंडप झालेल्या वादळी वार्‍याने कोसळला. तर चाळीसगाव, एरंडोल, पाचोरा, भडगाव, रावेर, जामनेर ,भुसावळ या तालुक्यात विजांच्या कडकडाटने वादळ वार्‍यासह कुठे जोरदार तर कुठे तुरळक पावसाने हजेरी दि.16 रोजी रात्री 7.45 ते 9 वाजेच्या सुमारास लावली. यावेळी काहि ठिकाणी विजपुरठा खंडीत झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

संत सदगूरू सखाराम महाराज महोत्सवाचा मंडप कोसळला

अमळनेर- येथील संत सखाराम महाराज संस्थानतर्फे द्विशताब्दी समाधी सोहळ्यासाठी बोरी पात्रातील भव्य मंडप दि.14 रोजी झालेल्या वादळी वार्‍याने कोसळला होता. सोहळा अवघ्या 8 दिवसांवर आलेला असतांना गेल्या 2 महिन्यांपासून या भव्य मंडपाची केलेली उभारणी निसर्गाच्या अवकृपेने क्षणात कोसळल्याने भविकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. दरम्यान हा मंडप जसाच्या तसा उभारण्यासाठी औरंगाबादहून 400 कारागिरांची टिम येत असून सोहळ्या पूर्वी हा मंडप ऊभारण्याचा मानस भाविकांनी केला आहे.

मनवेल येथे तुरळक पाऊस

मनवेल ता. यावल- मनवेल येथे पावसाने वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने शेतकरी व नागरिकांची तारांबळ उडाली. दुपारी ढग दाटल्यानंतर रात्री दहा वाजेला पावसाला सुरुवात झाली. थोरगव्हाण पिळोदासह काही ठिकाणी अर्धा ते तास पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.

साकळीत वादळीवार्‍यासह हलका पाऊस

साकळी ता.यावल- सोमवारी सकाळपासूनच आभाळी वातावरण बनले होते. दिवसभर उन्हाची तीव्रता सुद्धा कमी झालेली होती. रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह विजा चमकू लागल्या व जोरदार सोसाट्याचा वारा वाहू लागला व हलक्या स्वरूपाचा पावसाने हजेरी लावली. पावसाळी वातावरणामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेले उन्हाच्या दाहकते पासून नागरिकांची सुटका झालेली होती. आज दिवसभर शेतकर्‍यांनी शेतातील कापलेले पीक जमा करून सुरक्षित ठिकाणी ठेवणे तसेच गुरांसाठी लागणारा चारा सुद्धा घरी वाहून नेला व शेतातील कामे उरकली एकूणच सध्या अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वांना चिंता लागून आहे

रावेर तालुक्यात अवकाळी पाऊस

सावखेडा – कोचुर – तालुक्यातील सावखेडा व कोचुर येथे सोमवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला.
सोमवारी सायंकाळी ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिसरात झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला मात्र बदलत्या हवामानाने नुकसान होवू नये ही चिंता शेतकर्‍याना लागली आहे. दरम्यान सोमवारी दिवसभर दमट वातावरणाने उन्हाच्या तडाख्यापासुन नागरिकांना दिलासा मिळाला होता.

जामनेरात अवकाळी पाऊस

जामनेर – शहरात रात्री 8 वाजेचे सुमारास अचानक वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यामूळे कांदा बियाणे पिकांचे मोठे नुकसान होणार आहें.

तालूक्यात गारखेडा, ओझर, सामरोद,पहूर, बेटावद परिसरात ही अवकाळी पाऊसाने तडाखा दिला. या अवकाळी पाऊसामूळे पिकांचे प्रचंड नुकसान होणार असून ऐन लग्नसराईच्या धामधूमीत घरदन्याची चांगलीच तारंबळ उडत आहे. वादळी वार्‍यामूळे अनेक वेळा विजपुरवठा खंडीत झाल्याने नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागला. आज सकाळपासूनच उन्हाची तीव्रता कमी होऊन ढगाळ वातावरण असल्याने पाऊसाची शक्यता वर्तविली जात होती.

चाळीसगाव येथे पाऊस

चाळीसगाव- परिसरात रविवारी सायंकाळी रिमझिम धारा बरसल्यानतंर सोमवारी अचानक वातावरणात बदल झाला. दिवसभर आभ्रट वातावरण होते. वातावरणात झालेल्या बदल्यामुळे उष्णेतेपासून काहीसा दिलासा मिळाला परंतू प्रचंड उकाड्याने नागरिक हैरान झाले होते. वातावरणातील बदल्यामुळे सायंकाळी 7.45 वाजेच्या सुमारास पाऊस पडला.रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.यावेळी विजपुरवठा खंडीत होता.

भुसावळात अवकाळी पावसाची हजेरी

भुसावळ- शहरासह परिसरात रात्री 9.30 वाजेच्या सुमारास सुसाट वार्‍यासह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यामुळे परिसरातील वातावरणात थंडावा जाणवत होता. दरम्यान दि. 14 रोजी जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. होती यामुळे दि. 15 रोजी परिसरात सकाळपासूनच अभ्राच्छादित वातावरण होते. यामुळे उन्हाची उष्णताही कमी जाणवत होती. दरम्यान रात्री पावसाने हजेरी लावली.

एरंडोलला पिंकाचे नुकसान

एरंडोल- येथे दि.14 रोजी झालेल्या पावसामुळे मका,ज्वारी, दादर हे उभे असलेले पिक आडवे झाले होते.तसेच आंबे, चिंचा, लिंबू या पावसामुळे झाडावरून खाली पडल्याने नुकसान झाले.सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास तुरळक पाऊस पडला होता.

मनुदेवी येथे अर्धा तास पाऊस

चिंचोली ता.यावल –
दि.14 रोजी तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी परीसरात चार ते साडेचार वाजता अर्धा तास पावसाने झोडपले. दुपारी तीन वाजल्यापासून परीसरात विजांचा कडकडाट सुरू होता. यावेळी मनुदेवी परीसरात खणा नारळ दुकानदारांची एकच तारांबळ उडाली. रविवार असल्याने मनुदेवी येथे बरेचसे भाविकांची उपस्थिती होती. संध्याकाळी साडेचार वाजता परीसरात वादळी वारेसह पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे काही वेळ का होईना परीसरातील ग्रामस्थ व भाविकांची ही तारांबळ उडाली. ऐन दुष्काळी परिस्थितीत या पावसाने हजेरी लावल्याने परीसरातील ग्रामस्थ सुखावले. आडगाव कासारखेडा चिंचोली परीसरात रात्री विजांचा कडकडाट सुरू होता. तर मनुदेवी परीसरात कांही बच्चे कंपनीने पावसात मनमुराद आनंद ही लुटला.

पाचोरा, भडगाव, जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे रात्री 9.45 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह तुरळक स्वरूपाचा पाऊस पडल्याने कांदा बियाणे, गुरांचा चारा ओला झाल्याने नुकसान झाले.

बिडगाव परिसरात केळीचे नुकसान

धानोरा ता. चोपडा – येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वतातच्या पायथ्याशी असलेल्या कुंड्यापाणी, शेवरे, बिडगाव, वरगव्हान परिसरात रविवार दि.14 रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान वादळी वा-यासह जोरदार पाऊसाने हजेरी लावली होती. यामुळे अनेक शेतकर्‍यांचे केळीचे झाडे कोसळुन मोठे नुकसान झाले. वृक्षही उन्मळ होते. तर विजेचे खांब कोसळुन बंद पडलेला विजपुरवठा तब्बल सोळा तासांनी पुर्ववत झाल्याने जनजिवन विस्कळीत होऊन पाण्यासाठी चांगलीच भटकंती झाल्याचे चित्र दिसुन आले.

रविवारी अचानक आलेल्या पाऊसाने सर्वांचीच तारांबळ उडाली.काही ठिकाणी मका, गहु, हरबरा, बाजरी, ज्वारी या पिकांनाही फटका बसला. तर गुरांचा चाराही खराब झाला. वादळी वार्‍याने बिडगाव येथील दशरथ पाटील, प्रताप पाटील, भालोदकर व सुदाम पाटील यांचे तर वरगव्हान येथील पोलीस पाटील गोरख पाटील, हुकूमचंद पाटील आदि शेतकर्‍यांचे हातातोंडाशी आलेल्या केळी बागांमधील हजारो झाडे जमीनदोस्त होऊन लाखोरूपयांचे नुकसान झाले आहे.

तर शेवरे तब्बल पाउन तास पाऊस होऊन जोरदार वादळात येथील सुभान पावरा यांच्यासह सात ते आठ नागरिकांच्या घरांचे छते उडून नुकसान झाले होते. ते दुरूस्तीचे काम हे बाधीत ग्रामस्य करित होते.अनेक घरांचे छत उडून नुकसान झाले.

उकाड्याने ग्रामस्य हैराण

43 अंशावर गेलेल्या तापमानाने घालमेल होत होती. त्यातच पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने पाऊस झाला मात्र उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने ग्रामस्य हैराण झाले आहेत. त्यातच विज वितरणच्या गचाळ कारभारामुळे तब्बल सोळा तास विज गायब राहिल्या जिवाची लाही लाही होत असल्याचे चित्र दिसुन आले.नुकसानीचे पंचनामे नाहीत-वादळाचा तडाखा काही ठराविक भागालाच असल्याने कोणतेही पंचनाम्याचे आदेश नसल्याचे सुत्रांकडून समजले.

LEAVE A REPLY

*