खा. पाटील यांच्या मध्यस्थीने दुहेरी वाहतुकीसाठी रेल्वेची भिंत तोडली

0
जळगाव |  प्रतिनिधी :  रेल्वे स्थानक परीसरातुन येणार्‍या-जाणार्‍या नागरीकांसाठी दुहेरी वाहतुकीचा मार्ग करण्यासाठी आज रेल्वे पार्कींगला लागून असलेली भिंत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशाने तोडण्यात आली. ही भिंत तोडण्यास रेल्वे प्रशासनाने नकार दिला होता. मात्र खा. ए.टी.पाटील यांनी रेल्वेचे महाप्रबंधक यादव यांच्याशी चर्चा करून यशस्वी तोडगा काढल्यानेच ही भिंत पाडण्यात आली.

रेल्वे स्थानकावर येण्या-जाण्यासाठी एकच मार्ग होता. या एकाच मार्गावरून चारचाकी, दुचाकी वाहनांचीही मोठ्याप्रमाणावर ये-जा सुरू असते. परीणामी वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. त्यामुळे विधानपरीषद सदस्य आ. चंदुलाल पटेल व आ.राजूमामा भोळे यांनी गोविंदा रिक्षा स्टॉप ते खान्देश सेंट्रल मॉल मधील २४ मीटरचा रस्ता दुहेरी मार्गासाठी मोकळा करावा अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती.

या मार्गात रेल्वे पार्कींगला लागून असलेली भिंत अडथळा ठरत होती. ही भिंत तोडण्यासाठी दोन्ही आमदारांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्र दिले होते. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन भिंत तोडण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र रेल्वेचे महाप्रबंधक यादव यांनी ही भिंत तोडण्यास स्पष्टपणे नकार दिला.

रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासनात या भिंतीवरून वाद निर्माण झाला होता. आज याविषयासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रेल्वेचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांची बैठक बोलावली होती.

या बैठकीला खा. ए.टी.पाटील, आ. चंदुलाल पटेल, महापौर नितीन लढ्ढा, रेल्वेचे महाप्रबंधक यादव, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, प्रांताधिकारी जलज शर्मा, डिवायएसपी सचिन सांगळे हे उपस्थित होते. बैठकीत खा. ए.टी.पाटील यांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून दुहेरी वाहतुकीची भूमिका समजावून सांगितली.

खा. ए.टी.पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे रेल्वे पार्किंगला लागून असलेली भिंत तोडण्याला रेल्वे प्रशासनाने सहमती दर्शविली.

भिंत पाडण्याचा शुभारंभ खासदारांच्या हस्ते

रेल्वे स्थानक परीसरातुन दुहेरी वाहतुकीसाठी रेल्वे पार्कींगला लागून असलेली भिंत तोडण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आले होते. भिंत तोडण्यापुर्वी खा. ए.टी.पाटील यांच्या हस्ते जेसीबीवर नारळ फोडुन शुभारंभ करण्यात आला. तसेच आ. राजूमामा भोळे, आ. चंदुलाल पटेल, महापौर नितीन लढ्ढा, डिआरएम यादव यांनीही नारळ फोडुन या कामाला सुरवात करून दिली.

काही मिनीटातच भिंत जमिनदोस्त

रेल्वे पार्कींगला लागून असलेली भिंत अवघ्या काही मिनीटात जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आली. ही भिंत तोडल्यामुळे रेल्वेस्थानक ते गोविंदा रिक्षा स्टॉपपर्यंतचा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी तयार झाला आहे.

पार्कींगसाठी खान्देश सेंट्रलला विनंती करणार

रेल्वे स्थानकात येणार्‍या-जाणार्‍या मोठ्या वाहनांच्या पार्कींगसाठी खान्देश सेंट्रल मॉलमध्ये खुली जागा आहे. या खुल्या जागेत पार्कींग करण्यासाठी खान्देश सेंट्रलच्या व्यवस्थापनाला विनंती केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*