यंदा देशात सरासरी 96 टक्के पाऊस

भारतीय हवामान खात्याचे दिलासादायी वर्तमान

0
नवी दिल्ली । वृत्तसंस्था :  मार्च महिन्यापासून अंग भाजून टाकणारा उन्हाचा कडाका वाढला आहे. एप्रिलमध्ये त्यात वाढ होत आहे. अशा वेळी महाराष्ट्राच्या अनेक भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून नागरिकांना काहिसा दिलासा मिळत असला तरी यंदाच्या पावसाबद्दल सर्वांनाच धाकधूक असताना भारतीय हवामान खात्याने आज पावसाविषयी दिलासादायी वर्तमान दिले आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाच्या शुभ वर्तमानामुळे शेतकर्‍यांसह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

दरवर्षी येणार्‍या मोसमी पावसाबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होतो. म्हणून त्याचे प्रमाण किती व कसे असेल याविषयी सर्व क्षेत्रात उत्सुकता असते. देशात यावेळी 7 टप्प्यांत लोकसभा निवडणूक होत असून सर्वत्र आचारसंहितेचा अंमल सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून अनुमती मिळाल्यावर भारतीय हवामान खात्याने आज दुपारी या वर्षीच्या मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला. यंदा सरासरीएवढाच मोसमी पाऊस पडेल. मोसमी पावसावर ‘अल निनो’चा प्रभाव असला तरी नंतर तो क्षीण होईल. तसेच अखेरीपर्यंत पाऊस सरासरी गाठेल. एकूण सरासरीच्या 96 टक्के पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.

चालू वर्षी ‘अल निनो’चा प्रभाव असल्याने त्याचा भारतीय मोसमी पावसावर प्रतिकूल प्रभाव पडेल, असा अंदाज अमेरिकन हवामान संस्था, ऑस्ट्रेलियन संस्था तसेच स्कायमेट या खासगी संस्थेने नुकताच वर्तवला आहे.़ ‘स्कायमेट’ने यंदा सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे सर्वत्र काळजीचा सूर उमटू लागला होता. आता भारतीय हवामान खाते पावसाबाबत कोणते भाकित वर्तवते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर हवामान खात्याने ‘स्कायमेट’पेक्षा दिलासादायी अंदाज वर्तवला आहे.

उत्सूकता आणि घालमेल

गेल्या वर्षी भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेटने देशात 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता़ मात्र सरासरीच्या 91 टक्के पाऊस पडूनसुद्धा देशाच्या अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे यंदा 96 टक्के पावसाचे भाकित वर्तवले गेले असले तरी प्रत्यक्षात किती टक्के पाऊस होईल याबद्दल आतापासूनच उत्सूकता आणि घालमेल वाढली आहे.

जास्त पावसाची शक्यता दोन टक्के

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के आहे. तर सरासरी इतक्या पावसाची शक्यता 39 टक्के आहे. अतिपावसाची शक्यता अवघी 2 टक्के आहे. दुष्काळाची शक्यता 17 टक्के वर्तवली गेली आहे.

LEAVE A REPLY

*