विवेकानंदनगरात हजारो लीटर पाण्याची नासाडी

0
जळगाव । प्रतिनिधी :  शहरातील विवेकानंदनगरात सोमवारी व्हॉल्व गळतीमुळे भर उन्हाळ्यात हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. पाण्याच्या होत असलेल्या नासाडीच्या घटनांकडे मनपा प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.

पाईपलाईन गळती, व्हॉल्व गळतीच्या घटनांचे सत्र नेहमीच सुरु झाले आहे. या अगोदर आठवडाभरापूर्वी मेहरुण येथे चाटे मळा, स्मशानभूमी येथे पाण्याच्या पाईपलाईन गळती झाली होती. दोन पाईपांना जोडणारा जॉईन्ट रबरचा होता, तो वाढत्या तापामानामुळे वितळला गेल्याने तसेच पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने या पाईपलाईनला गळती झाली होती.

यावेळीही हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली होती. तेथील पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करुन पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात आला होता. या पाठोपाठ आठवडा होत नाही तोच विवेकानंद येथे पाण्याच्या पाईपलाईनला व्हॉल्व गळती सुरु झाली. यामुळे पाईपलाईनमधून हजारो लीटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे. मनपा प्रशासन मात्र पाणी गळतीवर आज, उद्या दुरुस्ती करु असेच नागरिकांना सांगत आहेत.

गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

वाघुर पाणीपुरवठा योजनेतून शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा हा आजच्या स्थितीला जेमतेम 20 टक्के आहे. पाणीपुरवठा हा अल्पप्रमाणात असल्याने पाण्याचे गांभीर्य मनपा प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. यापुढे पाण्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होणार असून जूनपर्यंत पाणीपुरवठा कसा पुरवता येईल, यासाठी ठोस उपाययोजना करायला पाहिजे. पाणी गळतीच्या वारंवार होणार्‍या घटनांमुळे पाणीपुरवठा हा कमी-कमी होत आहे. पाईपाईनच्या देखरेखीसाठी समिती मनपा प्रशासनाने नेमली पाहिजे, असेही शहरवासियांकडून बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

*