देशात आणि महाराष्ट्रातही जनता सत्ता बदल करण्याच्या मानसिकतेत : शरद पवार

0
कोल्हापूर : भाजपने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली, लोकांनी संधी दिली, पण पाच वर्षांत त्याचे सोने करता आले नाही, त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रातही जनता सत्ता बदल करण्याच्या मानसिकतेत आहे, राज्यात तर आघाडीचीच हवा आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार चार वेळा राज्याच्या दौऱ्यावर यावे लागत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. दिलेली आश्वासने पाळली नाहीत, सांगण्यासारखे काही काम केले नाही म्हणून मतदारांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोदी टीका करून संभ्रमावस्था निर्माण करत आहेत.
मोदींनी माझ्यावर आधी व्यक्तिगत हल्ला केला, त्याला प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर ‘चांगलं’ बोलून संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काश्मीरच्या भूमिकेबाबत आरोप केले. प्रत्यक्षात काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती किंवा त्यांच्या पक्षाशी आमचा काहीही संबंध नाही. उलट भाजप त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होता. त्यामुळं काश्मीरविषयी माझ्याकडं उत्तरं मागण्यापेक्षा मोदींनीच ती द्यावीत,’ असं त्यांनी सुनावलं.

‘चार वर्षांपूर्वी मोदी काश्मीरमध्ये गेले, तेथे विकासाचा कार्यक्रम मांडला. तेथील जनेतेने त्याचे स्वागत केले. पण चार वर्षांत त्यातील एकाही मुद्याची अमंलबजावणी झाली नाही. यामुळे तरुण पिढी संतप्त झाली आहे. तेथील जनतेचा विश्वास ते संपादन करू शकले नाहीत. त्याचा दोष ते इतरांवर ढकलत आहेत,’ असं पवार म्हणाले.

देशात दोन पंतप्रधान हे काँग्रेसचे धोरण तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल मोदींनी पवारांना केला होता. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, ‘घटनेत नसताना हे दुसरे पंतप्रधानपद आले कुठून? काश्मीर भारतात विलीन होताना १९४८ला काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही अधिकार त्या राज्याला दिले. तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. मग त्याचा दोष मोदी माझ्यावर कसं टाकतात?’

मोदी सरकार न्यायव्यवस्था, रिझर्व्ह बँक आणि लष्कराचा स्वार्थासाठी वापर करत असल्याचा आरोप करताना पवारांनी त्याची अनेक उदाहरणे दिली. ते म्हणाले, मोदी सरकारची ही भूमिका लोकशाहीला आणि संविधानाला अतिशय घातक आहे. देशाच्या इतिहासात असे कधी झाले नव्हते.

चार न्यायाधीशांनी सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करणे, रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी राजकीय हस्तक्षेपामुळे राजीनामा दिल्याची चर्चा आणि लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात सैनिकांच्या शौर्याचा फायदा राजकीय नेते घेत असल्याची खंत हे सारेच गंभीर आहे. ही प्रवृत्ती घातक आहे. त्यामुळे त्याचा पराभव केला पाहिजे. बोफोर्स बाबत विरोधकांनी संसदीय समितीच्या वतीने चौकशीची मागणी केली, राजीव गांधीनी ती मान्य केली.

समितीने यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले, आता मात्र चौकशीची मागणी केल्यानंतर गोपनीयतेचा मुद्दा पुढे करून टाळले जात असल्याचा टोला मारताना ते म्हणाले, संसदेला गोपनीयतेबाबत सांगायचे, मग ही कागदपत्रे वृत्तपत्रात कशी प्रसिद्ध झाली. राफेलमधील व्यवहार मान्य नसल्यानेच मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रीपदासारखे देशाचे एवढे मोठे पद सोडून गोव्यासारख्या अतिशय छोट्या राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, आर.के.पोवार, व्ही.बी. पाटील, प्रा. जयंत पाटील, अनिल साळोखे, अदिल फरास उपस्थित होते.

हवेप्रमाणे धोरण बदलणारे ठाकरे

बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्या शब्दाला किंमत होती, पण आज ज्यांच्याकडे पक्षाचा कारभार आहे, ते दर १५ दिवसांनी हवामान बदलेल, त्यानुसार धोरण बदलतात असा जोरदार टोला पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मारला. ते म्हणाले, ‘पंढरपूरच्या सभेत युती गेली खड्ड्यात असे ते म्हणाले, अमित शहांचा उल्लेख अफलजखान असा केला, पण नंतर ते त्यांच्याच हातात हात घालून प्रचार करत आहेत. सोयीने विधान करणारे आणि टीका करणारे ते नेते आहेत.’

LEAVE A REPLY

*