वर्षभरात जिल्ह्यात 609 बालकांचा मृत्यू

0
जळगाव । दि.21 ।बालमृत्यूचे प्रमाण रोखण्याचा दावा शासकीय स्तरावरुन केला जात असला तरी जिल्ह्यात बालमृत्यूचे सत्र सुरुच आहे.
जळगाव जिल्ह्यात वर्षभरात 609 बालकांचा मृत्यू झाला असून चाळीसगाव, रावेर तालुक्यात सर्वाधिक 74 बालकांचा मृत्यू झाला आहे.
कुपोषण निर्मुलनासह बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी राज्यातील जळगाव, धुळे, नंदुरबारसह 16 आदिवासी जिल्ह्यामध्ये विविध योजना राबविण्यात येत आहे.
मात्र बालमृत्यूचे प्रमाण कमी होतांना दिसून येत नाही. युनिसेफच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे जनजागृती केली जात असल्याने काही प्रमाणात बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

परंतु जळगाव, धुळे जिल्ह्यासह अन्य आदिवासी जिल्ह्यात बालमृत्यूचे सत्र सुरुच आहेत. त्यामुळे समाजमन देखील सून्न झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात मार्च 2016 ते मार्च 2017 या वर्षभराच्या कालावधीत 609 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बालमृत्यू रोखण्यावर नियंत्रण आणण्याचा दावा करणार्‍या आरोग्य यंत्रणेला फार मोठी चपराक आहे.

किंबहूना बालमृत्यू रोखण्यास आरोग्य यंत्रणाना सपशेल अपयशी ठरली आहे.शासकीय योजना कागदावरचबालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी, कुपोषण निर्मुलनासाठी तसेच आदिवासी, दुर्गम, ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येेतात.

बालमृत्यू रोखण्यासाठी 18 सप्टेंबर 2014 मध्ये अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जननी शिशु सुरक्षा योजना, डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजना, नवसंजविनी योजना उत्तम आहेतच.

परंतु प्रशासकीय पातळीवर प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने या योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.आशा वर्कर्स्चे मानधन वेळेवर मिळत नसल्याने योजना दुर्लक्षितआदिवासी भागात नवजान शिशूच्या संगोपणासाठी एचबीएनसी (होम बेस न्यू बॉर्न केअर) आणि एसएनसीयू (स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट)चा योजना देखील राबविण्यात येत आहे.

या योजनांची आशा वर्कर्स् यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र आशा वर्कर्स् यांचे सहा-सहा महिने किंवा वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्या दुर्लक्ष करतात, परिणामी शासनाच्या योजना ग्रामीण भागात दुर्लक्षित राहत असल्याचे दिसून येत आहे.

शासनाची उदासिनताआदिवासी, दुर्गम भागात शासकीय आरोग्य यंत्रणा पोहचत नाही. ही यंत्रणा तोकडी आहे. योजना पोहचविण्याबाबत शासनाची उदासिनता दिसून येत आहे. त्यामुळे बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे.

 जळगाव जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण

अमळनेर 30   भडगाव 28   भुसावळ 12   बोदवड 17   चाळीसगाव 78   चोपडा 46   धरणगाव 33   एरंडोल 12   जळगाव 58   जामनेर 66   मुक्ताईनगर 19   पाचोरा 47   पारोळा 22   रावेर 78   यावल 63   एकुण 609

LEAVE A REPLY

*