शेतकरी कर्जमाफीसाठी सोमवारपासून अर्ज नोंदणी

0
जळगाव । दि.21। प्रतिनिधी-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात शेतकरी कर्जमाफी योजनेचे अर्ज नोंदणीला दि. 24 जुलैपासून सुरुवात होत असुन शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक झाल्यास संबंधीतांवर फौजदारी कारवाई करण्याचा ईशारा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज एका बैठकीत दिला.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज संबंधित यंत्रणेच्या अधिकार्‍यांची बैठक जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचा असून अर्ज भरतांना शेतकर्‍यांनी आपले आधार कार्ड सोबत घेवून जाणे आवश्यक आहे. आधार कार्ड क्रमांक अथवा आधार कार्ड मिळाले नसेल परंतु त्यांनी आधार कार्ड नोंदणी केली असेल तो नोंदणी क्रमांक घेवून जाणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात 869 केंद्र
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात महा ऑनलाईनची 177, सी.एस.सी. एस.पी.व्ही.ची 700 तर आपले सरकार वेब पोर्टलची 869 केंद्र उपलब्ध आहे. कर्जमाफी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी या बैठकीत दिली.

अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असले तरी ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांनाही अर्ज दाखल करता येणार आहे. परंतु त्यांना आधार कार्ड काढून बँक सीडींग केल्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.

शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये
अर्ज दाखल करुन घेतांना ऑनलाईन केंद्र चालकांनी दक्षता घेणे आवश्यक असून कोणत्याही शेतकर्‍यांची अडवणूक होणार नाही किंवा अर्ज भरून घेण्यास टाळाटाळ होणार नाही, अर्ज भरुन घेण्यास विलंब होणार नाही, अथवा कोणत्याही प्रकारे शेतकर्‍यांची पिळवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा संबंधीतांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. या बैठकीस जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निबंधक, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, महा ऑनलाईनचे स्वप्निल पाटील, सी.एस.सी.एस.पी.चे राहुल देवरे आदि उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*