अनुदान घेवून वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम न करणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करणार!

0
जळगाव । दि.21 । प्रतिनिधी-स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान घेवून अद्यापपर्यंत बांधकाम न करणार्‍या 1183 लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी दिला आहे.
दरम्यान, ज्या नागरिकांना वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान पाहिजे असेल त्यांनी अर्ज करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ज्यांच्याकडे वैयक्तिक शौचालय नाही, परंतु जागा असेल अशा कुटूंबियांना शासनातर्फे 12 हजाराचे तर महापालिकेकडे 5 हजार असे 17 हजाराचे अनुदान दिले जाते.

वैयक्तिक शौचालयासाठी महापालिकेने सर्वेक्षण केल्यानंतर 9 हजार 922 वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 6 हजार 980 लाभार्थ्यांना पहिल्या टप्यात अनुदान दिले आहे.

3 हजार 779 शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून 2 हजार 18 शौचालयाचे बांधकाम सुरु आहे. तर 1 हजार 183 लाभार्थ्यांनी पहिल्या टप्यातील अनुदान घेवून सुद्धा बांधकाम न केल्यामुळे संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार आहे.

नोटीस बजावल्यानंतरही काम न सुरु केल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल कण्यात येणार असल्याचे उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी सांगितले.

जुन्या अर्जावर कार्यवाही करणार
वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज करुन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यासाठी उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी तांबापुरात जावून नागरिकांची बैठक घेतली. दरम्यान, येथील नागरिकांनी यापूर्वी अर्ज केले असून अद्यापपर्यंत अनुदान मिळालेले नसल्याची तक्रार केली. तसेच वारंवार आरोग्य विभागात जावून अर्जावर कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यावर उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी ज्यांचे जुने अर्ज असतील, त्यांच्या अर्जावर कार्यवाही केली जाईल असे सांगितले. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी लाभ घ्यावा आणि शहर हगणदारीमुक्त करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*