अजिंठा चौफुलीवरील अतिक्रमणावर हातोडा

0
जळगाव । दि.19 । प्रतिनिधी-सुशोभीकरणाच्या दृष्टीने शहरातील अजिंठा चौकातील अतिक्रमणावर आज पोलिस बंदोबस्तात हातोडा मारण्यात आला.
प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलनाची ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अजिंठा चौकाने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले.
अजिंठा चौफुलीवर चारही बाजूंना अतिक्रमणाचा विळखा झाला होता. त्यामुळे वारंवार वाहतुक विस्कळीत होत असल्याने अपघातांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.

दरम्यान प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकार्‍यांनी याठिकाणी पाहणी करुन अतिक्रमण काढण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आज महामार्गवरील चारही बाजूने गोलाईसाठी 40 फूटापर्यंतची मार्कींग केली होती.

मार्कींगमध्ये सातपुडा शोरुमच्या बाजूला असलेल्या एका धार्मीक स्थळ येत असल्याने या धार्मीक स्थळाचे देखील अतिक्रमण काढण्यात आले.

अतिक्रमण काढण्यापूर्वी आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते याठिकाणी असलेल्या धार्मीक स्थळामध्ये पुजा करुन व श्रीफळ फोडून अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय कराळे याच्याहस्ते आ. भोळेंचे पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी उपमहापौर ललित कोल्हे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, आर्किटेक्चर शिरीष बर्वे, प्रा.डी.डी. बच्छाव, डिवायएसपी सचिन सांगळे, नहीचे प्रकल्प सहसंचालक अरविंद गंढी, डॉ. राधेश्याम चौधरी, नितीन बरडे, प्रशांत नाईक यांच्यासह महापालिकेतील अतिक्रमण, बांधकाम, नगररचनाकार, पाणी पुरवठा, आरोग्य विभगातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

14 डेरेदार वृक्षांची कत्तल
सातपुडा अ‍ॅटोमोबाईल्सच्या लगत अतिक्रमणात गेल्या 30 वर्षांपूर्वी आ. भोळे यांचे सासरे सुरेश तुकाराम खडके यांनी हे धार्मीक स्थळ बांधले होते.

त्यानंतर 1983 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला होता. परंतू आज या धार्मीक स्थळाचे देखील अतिक्रमण काढण्यात आले.

दरम्यान या परिसरात सुमारे 14 वड, पिंपळ, कडुनिंब, अशोकाची डेरेदार वृक्ष होती. परंतू चौक सुशोभिकरण करण्यासाठी व वाहतुकीस अडथळा ठरत असल्यान हे वृक्ष इलेक्ट्रीक कटर व जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले.

महापौरांनी तोडलेल्या झाडांच्या बदल्यात याच जातीची वृक्ष इतर ठिकाणी लावण्यात येणार असल्याचे सांगीतले.

अजिंठा चौकात पुन्हा मोहीम राबविणार
अजिंठा चौफुलीवरील चारही बाजूंनी व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकी अडथळा निर्माण होत असल्याने याठिकाणी वारंवार वाहतुक विस्कळीत होत महापालिकेकडून या चौकातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे लवकरच हा चौक अतिक्रमण मुक्त होणार असून महामार्गावरुन डावीकडे पर्यायी रस्ता करण्यासाठी अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

त्यामुळे अपघात व वाहतुकीची कोंडी थांबण्यास मदत होणार आहे. तसेच महामार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणारे विद्युत खांब रस्त्याच्या कडेला स्थलांतरीत करण्याचे आदेश महावितरणच्या अधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिले.

तगडा पोलिस बंदोबस्त
अतिक्रमण काढत असतांना याठिकाणी कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिस प्रशासनातर्फे तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान सायंकाळी उशीरापर्यंत या चौकातील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरु होती.

महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा
महामार्गावर अतिक्रमणाचा विळखा असल्याने आज याठिकाणावरील अतिक्रमण काढण्यात आले. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने काही वेळ वाहतुक विस्कळीत होवून वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

नियम मोडल्यास होणार दंड
शहरात येणारे ट्रक महामार्गाच्या कडेलाच अवजड ट्रकची पार्कींग करीत असल्याने याठिकाणी वाहतुकची कोंडी निर्माण होत असते. आजपासून याठिकाणी ट्रक चालकांना ट्रक लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच याठिकाणी ट्रक लावल्यास त्याच्याकडून दंड वसूल करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी वाहतुक पोलिसांना दिले.

जीर्णोद्धार करुन देण्याचे आश्वासन
शहरातील अजिंठा चौफुलीवरच्या एका बाजूला असलेल्या धार्मीक स्थाळाचे आज अतिक्रमण काढण्यात आले. मात्र अतिक्रमण काढण्यापुर्वी काही जणांकडून यास विरोध करण्यात आला. परंतू आ. राजूमामा भोळे व महापौर नितीन लढ्ढा यांनी त्यांना मंदिराचा जीर्णोद्धार करुन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मनपाचे दोन जेसीबी, 40 ट्रक व ट्रॅक्टर व सुमारे 70 कर्मचार्‍यांच्या मदतीने याठिकाणी अतिक्रमण काढण्यात आले.

प्रशासनाकडून विश्वासघात – आ.भोळे
अजिंठा चौफुलीवरील मंदिराची संरक्षण भिंत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच मंदिराला जो पर्यंत पर्यायी जागा देवून प्राणप्रतिष्ठा केली जाणार नाही. तोपर्यंत मंदिर तोडण्यात येणार नसल्याचे महापौर व जिल्हाधिकार्‍यांनी आश्वासन दिले होते. परंतू प्रशासनाने मंदिर पाडून विश्वासघात केला आहे. त्यामुळे सर्वांच्या भवाना दुखावल्या गेल्या असल्याचे आ.राजूमामा भोळे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*