Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव देश विदेश मुख्य बातम्या

इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील निवडणूकीच्या मजकुरासाठी परवानगी गरजेची

Share
जळगाव । प्रतिनिधी :  राजकीय पक्ष आणि उमेदवारांना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून तसेच सोशल मीडियावर प्रचारासाठी केल्या जाणार्‍या जाहिरांतींना आता पूर्वप्रमाणन करून घ्यावे लागणार आहे.

प्रसारण दिनांकाच्या तीन दिवस आधी ही जाहिरात प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक असून त्याशिवाय, अशा प्रकारची कोणतीही जाहिरात त्यांना प्रसारित करता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथील अल्पबचत कार्यालय येथे माध्यम प्रमाणीकरण व सनियंणत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या कक्षाकडून प्रसारणासाठीचा आवश्यक मजकूर प्रमाणीकरण करुन घेणे आवश्यक आहे. उमेदवार अथवा त्यांच्याकडून केल्या जाणार्‍या राजकीय पक्षांच्या जाहिराती यांना प्रसारणपूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे.
उमेदवारांनी ते करणार असलेल्या जाहिरातीचा मजकूर आणि ऑडिओ/व्हिडिओ यांच्या दोन सीडीज आणि त्यामधील मजकुराच्या प्रमाणित प्रतीसह माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सदर मजकूर प्रसारणासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र घेऊनच प्रसारित करावी लागणार आहे. यासाठीचा खर्च संबंधित उमेदवारांच्या खात्यात नोंदविणे आवश्यक आहे.

विनापरवानगी कोणताही जाहिरात मजकूर इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मीडियातून प्रसारित करण्यास प्रतिबंध राहणार आहे. पोलिसांचा सायबर सेल विभागही निवडणूक काळात सोशल मीडियावर लक्ष ठेवून असणार आहेत. याशिवाय, वर्तमानपत्रात उमेदवारांकडून दिल्या जाणार्‍या जाहिरातीवरही ही समिती लक्ष ठेवणार असून त्याचा अहवाल खर्च नियंत्रण समितीकडे पाठविला जाणार आहे.

माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडे अर्ज करताना विहित नमुन्यातील अर्ज करणे आवश्यक आहे. यात अर्जदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, जाहिरात राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने दिली आहे का, ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, त्या मतदारसंघाचे नाव, राजकीय पक्षाच्या मुख्यालयाचा पत्ता, ज्या वाहिनीवर/केबल नेटवर्कवर जाहिरात प्रसारित करण्याचे प्रस्तावित आहे.

वाहिन्या/केबल नेटवर्क, जाहिरात सादर करण्याचा दिनांक, जाहिरातीमध्ये वापरलेली भाषा (यथोचितरित्या साक्षांकित केलेल्या प्रतिलेखांसह इलेक्ट्रॉनिक्स फॉर्ममधील दोन प्रतींसह जाहिरात सादर करणे आवश्यक), जाहिरातीचे शीर्षक, जाहिरात निर्मिती खर्च, जाहिरातीच्या संख्येची विभागणी आणि अशा प्रत्येक जाहिरातीच्या प्रस्तावित दरासह प्रस्तावित प्रसारणांचा अदमासे खर्च, एकूण समाविष्ट खर्च, जाहिरात निर्मिती आणि प्रसारण यांच्याशी संबंधित असलेले सर्व प्रदान धनादेश अथवा डिमांड ड्राफ्टद्वारे करण्याबाबत हमीपत्र आदी माहिती देणे आवश्यक राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!