लसीकरणाच्या कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई

0
जळगाव । दि.17। प्रतिनिधी-बालकांमधील मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन असल्याने संबंधित अधिकार्‍यांनी लसीकरणाचे काम मिशनमोडवर पूर्ण करावे.
जो कोणी या कामात हलगर्जीपणा करील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज दिला.
मिशन इंद्रधनुष्य मोहिमेबाबत टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयास संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. आर पाटील, निवासी वैद्यकी अधिकारी डॉ. विजय जयकर, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ कमलाकर लश्करे आदि उपस्थित होते.

केंद्र शासनाने एप्रिल 2017 मध्ये देशातील 179 जिल्हयांमध्ये मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत चौथा टप्पा मोहिम हाती घेतली आहे.

या मोहिमेमध्ये राज्यातील 9 जिल्हे व 18 महानगरपालिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये जळगाव जिल्हा व महानगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे.

त्यानुसार 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यासाठी 7 ते 13 जुलै दरम्यान जिल्हयात ही मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेच्या काळात चाळीसगाव, चोपडा आदि ठिकाणी आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधीनी भेट दिली. यावेळी आवश्यक बाबींची पूर्तता केली नसल्याचे आढळून आले, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधीनी बैठकीत सांगितल्याने याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तसेच यास जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. जिल्हयातील जे बालके लसीकरण मोहिमेपासून वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेले आहे. त्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

 

LEAVE A REPLY

*