धानोरा जि.प.मराठी शाळेचा अहवाल सीईओंकडे सादर

0
जळगाव । दि.16 । प्रतिनिधी-चोपडा तालुक्यातील धानोरा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क दोन वर्षापासून खाजगी इंग्लीश मिडीयमची शाळा सुरु होती.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळेची चौकशी करुन सोमवारपर्यंत अहवाल मागविला होता. त्या अनुषंगाने आज सकाळी चोपडा गटशिक्षणाधिकारी व जि.प.शिक्षण समिती सदस्य आदींनी शाळेच्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करून अहवाल सीईओंकडे दिला आहे.

रचोपडा तालुक्यातील धानोरा येथे जि.प.च्या मराठी शाळेत गेल्या दोन वर्षापासून एका खाजगी संस्था चालकांकडून इंग्लीश मिडीयमची शाळा उघडपणे सुरु होती.

मुख्याध्यापक व शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष यांच्या ठरावानुसार एका संस्थेत शिक्षक म्हणून तसेच काही राजकीय पुढार्‍यांना जि.प.ची मराठी शाळा दरमहा 1700 रुपये प्रमाणे वर्षाला 20 हजार 400 प्रमाणे भाड्याने देण्यात आली.

जि.प.ची शाळा भाड्याने देवून संबंधीतांनी शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. याबाबत शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या सदस्य प्रतिभा ज्ञानेश्वर सोनवणे यांनी शिक्षणमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच जि.प.शिक्षण सभापती यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला असता आज गटशिक्षणाधिकारी यांच्यासह पदाधिकार्‍यांनी या शाळेच्या भोंगळ कारभाराची चौकशी केली. दरम्यान तसेच शाळेच्या भोंगळ कारभाराचा अहवाल सीईओंकडे प्राप्त झाला असून याबाबत संबंधीतांवर कुठली कारवाई केली जाते याकडे गावकर्‍यांसह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

 

LEAVE A REPLY

*