खर्चाच्या वादात अडकली डीपीडीसी सदस्यांची निवड

0
जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-जिल्हा नियोजन मंडळाच्या रिक्त असलेल्या 35 जागांची निवड प्रक्रिया ही निवडणूक खर्चाच्या वादात अडकल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या निवडूकीनंतर नवीन सदस्यांची जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून निवड केली जाते.
जिल्हा नियोजन मंडळाच्या समितीवर जिल्हा परिषदेच्या 27 व नगरपालिकेच्या 8 सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातर्फे पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.

दि.19 ऑगस्टपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहे. तसेच या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करुन निवड प्रक्रिया राबवायची आहे. या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे 25 लाख रुपये निधीची मागणी केली आहे.

हा निधी नियोजन समितीमार्फत जोपर्यंत भेटत नाही, तोपर्यंत निवडणूकीचा कार्यक्रम घोषित करता येणार नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

यापूर्वी देखील राबविलेल्या निवडणूक प्रक्रियेचा खर्च प्राप्त झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, निवडणूक खर्चाच्या वादामध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यांची निवडणूक प्रक्रिया अडकल्याचे तुर्तास तरी दिसून येत आहे.

 

LEAVE A REPLY

*