गोलाणी व्यापारी संकुल चकाचक

0
जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-गोलाणी व्यापारी संकुल अस्वच्छतेचे आगार बनले होते. अस्वच्छतेमुळे प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी चार दिवस संकुल बंद करण्याचे आदेश दिले होते.
परंतु व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळांनी विनंती केल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी बंदचे आदेश मागे घेवून सामूहिक स्वच्छता मोहीम राबविली.
मनपाच्या आरोग्य विभागातील 550 कर्मचार्‍यांच्या माध्यमातून साफसफाई केल्यामुळे गोलाणी व्यापारी संकुल चकाचक दिसून आले.
दरम्यान, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांनी साफसफाई मोहिमेदरम्यान तीन वेळा भेट देवून पाहणी केली.

गोलाणी व्यापारी संकुलात महापालिकेच्या वतीने सकाळी 6 वाजेपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 550 कर्मचार्‍यांनी साफसफाई करुन 78 ट्रक्टर कचरा संकलित करुन विल्हेवाट लावली.

  

स्वच्छता गृह, रिक्त असलेले हॉल, मीटर रुम मध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य होते. सफाई कर्मचार्‍यांनी पूर्णपणे पाण्याने धुवून स्वच्छ केले.

मनपा कर्मचारी सकाळपासून साफसफाई करत होते. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना नाश्ता देवून आपली सामाजिक बांधिलकी देखील जोपासली.

व्यापार्‍यांकडून वसुली
गोलाणी व्यापारी संकुलाच्या साफसफाईसाठी तीन महिन्यासाठी प्रत्येक दुकानदारांनी 1100 रुपये जमा करण्याबाबत व्यापार्‍यांनी काल निर्णय घेतला.

या निर्णयाच्या अनुषंगाने मनपाच्या किरकोळ वसुली विभागातील 12 कर्मचार्‍यांच्या माध्यमातून वसुली करण्यात येत होती.

232 दुकानदारांकडून 2 लाख 52 हजाराची वसुली करण्यात आली. काही व्यवसायिकांनी वसुलीसाठी गेलेल्या मनपाच्या कर्मचार्‍यांजवळ नाराजी व्यक्त केली.

आम्हाला विश्वासात घेतले नाही. काही व्यवसायिकांनी परस्पर असा का निर्णय घेतला? प्रत्येकांच्या दुकानासमोर कचरा कुंडी ठेवणार का? नियमित साफसफाई होईल का? अशा भावना देखील काही व्यापार्‍यांनी मनपा कर्मचार्‍यांजवळ व्यक्त केल्या.

फलक काढण्यासाठी आठ दिवसाची मुदत
गोलाणी व्यापारी संकुलात बहुतांश मोबाईल विक्रीचे दुकाने आहेत. प्रत्येक दुकानदारांनी विनापरवानगी मोठमोठे फलक लावलेले आहेत.

दरम्यान जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी सर्वच दुकानदारांना फलक काढण्याची सूचना करुन आठदिवसाची मुदत दिली.

दिलेल्या मुदतीत फलक न काढल्यास विद्रुपीकरण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करणार असा इशारा देखील जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी व्यापार्‍यांना दिला.

 

LEAVE A REPLY

*