Blog : ‘सोनू, तुला मुंबईचा भरोसा नाय काय?’

0

सरत्या सप्ताहात मुंबईत राजकीय स्तरावर धावपळ सुरू होती ती राष्ट्रपतिपदाच्या सोमवारी होत असलेल्या मतदानाच्या तयारीची! विविध राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या स्वगतात मग्न होते. दोन्ही उमेदवारांच्या आमदार-खासदार भेटीगाठींचा सिलसिला सुरू होता.

ही राजकीय धामधूम सुरू असतानाच मुंबईत पावसाचे आगमन पुन्हा एकदा झाले. राज्याच्या अनेक भागातही सरत्या सप्ताहात पावसाने चांगली हजेरी लावली. दुबार पेरणीचे संकट टळल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. अशा आनंदात मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक नवे वादळ तयार झाले.

ते आहे एका गाण्याचे. ‘सोनू, तुजा माज्यावर भरोसा नाय काय?’ हे जुने लोकगीत गेल्या काही महिन्यांत अचानक समाजमाध्यमांत लोकप्रिय झाले आहे. या गीताचे अनेक नवे अवतार यू ट्यूबवर झळकू लागले आहेत. त्यामागची ग्यानबाची मेख काय?

सरत्या सप्ताहात मुंबईत राजकीय स्तरावर धावपळ सुरू होती ती राष्ट्रपतिपदाच्या सोमवारी होत असलेल्या मतदानाच्या तयारीची. विविध राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या स्वगतात मग्न होते. आमदार, खासदारांच्या व दोन्ही उमेदवारांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू होता.

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे रामनाथ कोविंद आणि कॉंग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या मीरा कुमार या दोघांनीही मुंबईत मागच्या काही दिवसात भेटी दिल्या आणि आपल्या मतदारांपुढे आपापल्या भूमिका मांडल्या. मीरा कुमार यांचे स्वागत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांनी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार्‍या यशवंतराव चव्हाण केंद्रात केले. मीरा कुमार यांनी तिथे विरोधी पक्ष आमदारांशी संवाद साधला. त्या पत्रकारांसीही बोलल्या.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची मते या निवडणुकीत फुटणार अशी चर्चा सुरू झाल्यामुळे की काय; पण त्या पुन्हा दुसर्‍यांदा मुंबईत येऊन गेल्या. कोविंद यांना विजयाची खात्री आहे.

त्यामुळे त्यांच्या मुंबई भेटीचा थाट काही निराळा होता. गरवारे क्लबमध्ये त्यांचे शानदार स्वागत मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रालोआचे घटक पक्ष असणारे शिवसेना नेते सुभाष देसाई, तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले व राज्याचे मंत्री महादेव जानकर अशांनी केले. उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी कोविंद गेले नाहीत पण त्यांनी ठाकरेंबरोबर फोनवरून संपर्क केला असे दिसते.

ही राजकीय धामधूम सुरू असतानाच मुंबई व परिसरात पावसाचे आगमन पुन्हा एकदा झाले. राज्याच्या अन्यही अनेक भागातही सरत्या सप्ताहात पावसाने पुन्हा चांगली हजेरी लावली. दुबार पेरणीचे संकट बहुधा टळल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

याशिवाय मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक नवे वादळ सरत्या सप्ताहात तयार झाले. ते आहे एका गाण्याचे. ‘सोनू, तुजा माज्यावर भरोसा नाय काय?’ हे एक जुने लोकगीत गेल्या काही महिन्यांत अचानक समाजमाध्यमांत लोकप्रिय झाले आहे. या जुन्या गीताचे अनेक नवे अवतार यू ट्यूबवर झळकू लागले आहेत.

महाविद्यालयातील तरुण पोरं-पोरी सोनूवर ताल धरत आपापले व्हिडीओ यू ट्यूबवर टाकत असल्यामुळे त्या गाण्याची एकच धूम सुरू झाली होती. त्यात सोनूच्या मूळ अवतारात बदल करीत एका एफएम रेडिओने मुंबई शहराच्या रामभरोसे कारभारावर नेमके बोट ठेवल्यामुळे त्या नव्या रिमिक्सने एकच धमाल उडवून दिली.

चार- पाच दिवसातच ते गाणे विविध समाजमाध्यमांतून असे जोरात फिरले की लाखो मुंबईकरांच्या मोबाईलमध्ये रेडिओ जॉकी आर जे मलिष्का मेंडोन्सा हिचे सोनू रिमिक्सच वाजताना ऐकू येत होते. मूळ लोकगीतात तरुण-तरुणींच्या प्रेमबंधाची कहाणी पेश होते.

अनेक मित्रांना गुलाबी प्रतिसाद देणार्‍या एका तरुणीने भोळ्या मित्राला केलेला सवाल आहे की सोनू, तुजा माज्यावर भरोसा नाय काय? यातील शेवटचे दोन शब्द पालुपदासारखे मागच्या बाजूने कोरसमध्ये म्हटले जातात. त्याच चालीवर, त्याच धर्तीवर मलिष्काने मुंबई महापालिकेला-बीएमसीला लक्ष्य केल्याचे दिसते. तिचे गाणे साधारणतः असे आहे….

मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? नाय काय!
रस्त्यात खड्डे कसे खोल खोल,

खड्ड्याचा आकार कसा गोल गोल,

मुंबई तुला बीएमसीचा भरोसा नाय काय? नाय काय!
मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल झोल!

मुंबई तू माज्यासंग गोड बोल

मुंबई तुला पावसावर भरोसा नाय काय? नाय काय!
मुंबईचा ट्राफिक किती लांब लांब,

ट्राफिकमध्ये आपण जाम जाम,

सिग्नलचा आकार कसा गोल गोल,

मुंबई तू माज्यासंग गोड बोल, गोड बोल,

मुंबई तुला बीएमीसीवर भरोसा नाय काय? नाय काय!
मुंबईचा पाऊस कसा ओव्हर फ्लो,

पावसामध्ये ट्रेन झाली स्लो स्लो, और स्लो!

ट्रेनचा शेड्यूल कसा झोल झोल, झोल झोल!

मुंबई तू माज्यासंग गोड बोल!
मुंबई तुला पावसावर भरोसा नाय काय? नाय काय !

मुंबईचा माणूस झाला बेहाल,

‘येईच लफडा होतो हर साल,’ हर साल !

पावसात ऍथॉरिटीची पोल खोल! पोल खोल!
मुंबई तू माज्यासंग गोड बोल, गोड बोल!

तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? नाय काय !

या गीताचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला. त्याच्या शेवटी गीतकार, संगीतकार, गीताचा दिग्दर्शक म्हणून ज्या पाट्या दिल्या आहेत त्याही हास्यस्फोटक ठराव्यात अशी मलिष्का व तिच्या टीमची इच्छा असावी.

त्यात, डायरेक्टर-बीएमसी! कॅमेरामन- अलीकडेच हाकलून दिला, म्युझिक-इंटरनेटसे चोरी किया, कलाकार रेड एफएम कामगार सेना! अशा पाट्या दिसत राहतात. या गाण्याची प्रतिक्रिया येणे अपेक्षितच होते.

कारण यात थेट मुंबई महापालिकेलाच लक्ष्य केले होते आणि पालिका ही सेनेची दुखरी नस, नाजूक जागा आहे, म्हटले तरी वावगे ठरू नये. त्याप्रमाणे शिवसैनिकांनी लगेचच एक दुसरे गाणे तयार केले आणि ते टीव्ही चॅनेलसमोर गाऊन गाखवत मलिष्काला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

पण असे करण्यात धोका हाच असतो की लोक उत्तर ऐकतच नाहीत. उत्तराच्या मिषाने मूळ विडंबनपर गाण्याचेच बोल लोकांना आठवत राहतात.

मलिष्काच्या मेंदूत आहे झोल झोल
तुझा मेंदू आहे गोल गोल,
तुझ्या मेंदूत असा कसा झोल झोल,
तुला पैसे घेऊन बोलायचे आहे तेवढे बोल बोल..
आर जे तुला मुंबईची बदनामी करण्याचे कारण काय काय?
मुंबईकरांना बीएमसीवर भरोसा हाय…!
पण मलिष्का, तुला बीएमसीवर भरोसा का नाय?

शिवसैनिकांनी म्हटले आहे की रेडिओ एफएम ९३.५० वर आर जे मलिष्काचे एक मुंबई महापालिकेवरचे गाणे सध्या सोशल मीडियावर व न्यूजमध्ये चर्चेचा विषय बनला आहे व या मलिष्काला सर्वांनी डोक्यावर घेतले आहे. पण मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे याची कावीळ ज्यांना आहे अशांनी हे गाणे रचले आहे.

मुंबईत सेनेची सत्ता आहे खरी; पण इथले सर्वच रस्ते मनपा बांधत नाही. तर राज्य सरकार व एमएमआरडीए यांचेही रस्ते आहेत. एमएमआरडीएची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. तर रस्त्यांसाठी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार आहेत, असे या सैनिकांनी म्हटले आहे.

त्यांचे म्हणणे आमची म्हणजे पालिकेची सारी जबाबदारी नसतानाही खड्ड्यांचे खापर महापलिकेच्या माथ्यावर मारले जाते. मुंबईचे सर्व रस्ते मुंबई महापलिकेच्या अखत्यारित यावेत ही मागणी आम्ही अनेक वेळा राज्य शासनाकडे केली आहे. पण राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.

मालिष्काला एकतर याची माहिती नसावी किंवा माहीत असून पण पैसे घेऊन मुंबई महापालिकेला बदनाम करण्यासाठी हे केलेले षडयंत्र असावे, असाही एक हेत्वारोप सेनेने केला आहे. या गाण्याची कडवेनिहाय चिरफाड सेनेने केली आहे. दुसर्‍या कडव्यात म्हणते की, मुंबईचे ट्राफिक किती लांब लांब अगं बाई हे ट्राफिक हाताळण्याचे काम वाहतूक विभागाचे असते आणि वाहतूक विभाग हा राज्य शासनाच्या अखत्यारित येतो.

यामध्ये बीएमसीचा कोणताही दुरूनही संबंध येत नाही. तेच रेल्वेगाड्या स्लो झाल्याविषयी आहे. खरे तर रेल्वे आणि मुंबई महापालिकेचा दूरवर काहीही संबंध नाही. रेल्वे, ट्रेनसेवा ही केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. ट्रेन शेड्यूल रेल्वे प्रशासनच पाहते. दुसरी गोष्ट रेल्वेची सेवा ही राज्य शासनाच्या अंतर्गतसुद्धा येत नाही. हेसुद्धा या मेंदूत झोल असणार्‍या बोलबच्चन मलिष्काला माहीत नसावे म्हणजे काय?

त्यातल्या त्यात एक बरे झाले आहे की मलिष्काने हे गाणे बीएमसी निवडणुकीनंतर तयार केले आहे. अन्यथा मोठाच अनर्थ ओढवला असता. रेड एफएमच्या स्टुडिओला आणि त्यातही मलिष्काबाईंना त्यावेळी जोरदार संरक्षणाची गरज भासली असती.

कारण निवडणुकीत भाजप-सेनेची अशी काही जोरदार लढत जुंपलेली होती की जर तेव्हा हे गाणे आले असते तर त्याचा संबंध सरळच निवडणुकीस लागला असता आणि मग सेनेला मलिष्कावर तुटून पडण्याशिवाय गत्यंतर उरले नसते!

– अनिकेत जोशी

LEAVE A REPLY

*