सेवा शुल्क देण्याच्या निर्णयानंतर गोलाणी व्यापारी संकुल बंदचे आदेश रद्द

0

जळगाव |  प्रतिनिधी :  मनपा इमारतीच्या बाजूलाच असलेल्या गोलाणी व्यापारी संकुलात प्रचंड अस्वच्छता असल्यामुळे प्रांताधिकारी जलद शर्मा यांनी फौजदारी दंड संहिता १३३ नुसार चार दिवस व्यापारी संकुल बंद करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे व्यापार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

दरम्यान, सकाळी ११ वाजेच्या सुमारास सर्व व्यापार्‍यांनी एकत्रित येवून साफसफाई करण्याचा तसेच आदेश मागे घेण्याबाबत विनंती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. तीन महिने प्रत्येक गाळेधारकांनी ११०० रुपये देण्याच्या निर्णयानंतर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी प्रांताधिकार्‍यांचे आदेश रद्द केले.

गोलाणी व्यापारी संकुलात साफसफाई होत नसल्याने शरद काळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रांताधिकारी जलद शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन त्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे केले.

त्यानुसार प्रांताधिकार्‍यांनी मनपा आयुक्तांसह आरोग्य अधिकार्‍यांना नोटीस बजावली होती. गोलाणी संकुलात अस्वच्छता असल्याने आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. साफसफाई अभावी कलम १३३ नुसार गोलाणी व्यापार दि.१९ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे व्यापार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली.

व्यापार्‍यांनी केली साफसफाई

गोलाणी व्यापारी संकुलात अस्वच्छता असल्यामुळे चार दिवस बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशान्वये व्यापार्‍यांनी आपआपली दुकाने बंद ठेवून स्वत: साफसफाई सुरु केली होती.

तीन महिन्यानंतर निविदा प्रक्रिया

प्रांताधिकार्‍यांनी दिलेले आदेश मागे घ्यावे, यासाठी गोलाणी व्यापारी संकुलातील व्यापार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, प्रांताधिकारी जलद शर्मा, डिवायएसपी सचिन सांगळे, जिल्हा सरकारी वकील ऍड.केतन ढाके, गोलाणी व्यापारी संकुल असो.चे अध्यक्ष सुभाष कासट, पुरुषोत्तम टावरी, रामजी सुर्यवंशी, मंगला बारी, गोपाल दर्जी, अनिल साखला, सुनिल पंजवाणी, सचिन छाजेड, देवांग दोशी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. चार दिवस दुकान बंद ठेवल्यामुळे नुकसान होईल. त्यावर समन्वयाने तोडगा काढावा, अशी विनंती व्यापार्‍यांनी केली.

दरम्यान तीन महिन्याच्या साफसफाईसाठी प्रत्येकी ११०० रुपये उद्या दि.१७ रोजी सकाळी ११ वाजेपासून ते ६ वाजेपर्यंत मनपा कर्मचार्‍यांकडे जमा करावे. तीन महिन्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून त्यासाठी येणारा खर्च व्यापार्‍यांनी द्यावा, असा निर्णय घेण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी प्रांताधिकार्‍यांनी बजावलेले आदेश रद्द केले.

सेवा शुल्क देण्याचा व्यापार्‍यांचा निर्णय

गोलाणी व्यापारी संकुल बंद ठेवण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे रात्री उशिरापर्यंत नोटीस बजावण्यात आल्या. तसेच जे दुकान बंद होते. त्या दुकानांच्या दारावर नोटीस डकविण्यात आल्या होत्या. सकाळी ११ वाजेला गोलाणीतील सर्व व्यापारी एकत्र आल्यानंतर बैठक झाली.

यावेळी गोलाणी व्यापारी संकुल असो.चे अध्यक्ष सुभाष कासट, पुरुषोत्तम टावरी, रामजी सुर्यवंशी, मंगला बारी, गोपाल दर्जी, अनिल साखला, सुनिल पंजवाणी, सचिन छाजेड, देवांग दोशी यांच्यासह सर्वच व्यापारी उपस्थित होते. दरम्यान सर्वानुमते निर्णय घ्यावा, अशी सूचना सुभाष कासट यांनी केली.

पुरुषोत्तम टावरी यांनी चार दिवस दुकान बंद ठेवून चालणार नाही. मनपाने लिफ्ट, सुरक्षा रक्षक, साफसफाई, स्वच्छता गृह या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास सेवाशुल्क भरण्यास व्यापारी तयार आहेत असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वानुमते व्यापार्‍यांनी मंजूरी दिली. मंगला बारी यांनी आपल्याला न्याय मिळायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावे, असे आवाहन दिले.

गोपाल दर्जी यांनी लोक सहभागातून साफसफाई करण्याबाबत सूचना मांडली. सचिन छाजेड यांनी चार दिवस दुकाने बंद ठेवण्यास आर्थिक नुकसान होईल असे सांगितले. अनिल साखला यांनी सर्वांनी संगठीत होवून सफाईचा निर्णय घ्यावा, अशी सूचना मांडली. त्यानंतर व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली.

कडकडीत बंद : पोलीस बंदोबस्त

गोलाणी व्यापारी संकुल बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकार्‍यांनी दिले. या आदेशानुसार सर्व व्यापार्‍यांनी आपआपली दुकाने बंद ठेवली होती. दरम्यान अनुचूती प्रकार घडू नये व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा. यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*