Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या राजकीय

जळगावच्या सागर पार्कसह शिवतीर्थ मैदानावर आज वाजणार लोकसभा निवडणूकांचा बिगुल

Share
जळगाव । लोकसभा निवडणूकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघातून गुलाबराव देवकर तर भाजपतर्फे जळगावातून आमदार स्मिता वाघ व रावेर मतदारसंघातून खासदार रक्षा खडसे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपा शिवसेना युतीतर्फे दोनही उमेदवारांचे अर्ज 28 रोजी दाखल करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी शिवसेना, रिपाइंचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहे. यानंतर उमेदवारांच्या सागरपार्कवर सभा होणार आहे. तर राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर यांची शिवतीर्थ मैदानावर सभा होणार आहे. काँग्रेसच्या भूमिकेकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे.

मतभेद दूर करणे भाजपासमोर आव्हान
राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर यांच्या सभां वाढल्या आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात झाली आहे. गुलाबराव देवकर यांचे चौकाचौकात बॅनरही झळकत आहे. भाजपमध्ये मात्र, प्रचारास अद्याप हवी तशी सुरूवात झालेली नाही. उमेदवार निश्चितीची प्रक्रियेने बराच वेळ खाल्याने आता उमेदवारांच्या हातात कमी वेळ आहे. त्यात भाजपमधील उमदेवार बदलामुळे विद्यमान खासदार ए. टी. पाटील हे बंडाच्या भूमिकेत दिसत असल्याने भाजपपुढील अडचणी वाढल्या आहेत.

त्यातच शिवसेना अजूनही पूर्णतः भाजपच्या सोबत नाही. अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप व सेनेचे अगदी टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे प्रचाराच्या आधी पक्षातील हे मतभेद व गटतट सांभाळणेच भाजपासमोर मोठे आव्हान आहे.

शिवसेनेची भूमिका आगामी मेळाव्यात ठरणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी जरी आम्ही उपस्थित राहत असलो तरी अजूनही भाजपला मदत करायची की नाही, यावर शिवसेनेने स्पष्ट शिक्कामोर्तब केलेले नाही. स्थानिक पातळीवर हे टोकाला गेलेले मतभेद भाजपला डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे यातून भाजपचे नेते कशी वाट काढतात हे बघे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रावेरच्या जागेबाबत ओढाताण
एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत असून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये अजूनही ओढाताण सुरूच आहे. नुकताच राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला मात्र, जागेबाबत अजूनही काही स्पष्ट झाले नसल्याने कार्यकर्ते पदाधिकार्‍यांमध्ये मोठा गोंधळ वाढला आहे. त्यातच जागा मिळत नसल्याने काँग्रेसने बहिष्कारस्त्र बाहेर काढले आहे.

मेळाव्यावर बहिष्कार टाकल्यानंतर आता नेमकी काँग्रेसची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. महिनाभरपूर्वीच जर रावेरची जागा काँग्रेसला मिळाली नाही तर जळगावात राष्ट्रवादीचे काम करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कार्यकर्ते पदाधिकार्‍यांनी मांडली होती. महिना उलटूनही अजूनही आघाडीत या जागेबाबत ठरलेले नाही. रोज नवे चेहरे समोर येत असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

उमेदवारी अर्ज प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग असणार आहे. या पार्श्वभूमीवर रावेर लोकसभा मतदार संघासाठी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर जळगाव लोकसभा मतदार संघासाठी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज दाखल करतांना 25 हजार रुपये अनामत रक्कम द्यावी लागणार आहे. तर इतर मागासप्रवर्गातील उमेदवारांना 12 हजार 500 रुपये अनामत रक्कम द्यावी लागेल. अर्ज दाखल करतांना दोन्ही मतदार संघातील उमदेवारांकडून होणारे शक्तीप्रदर्शन लक्षात घेता.

उमेदवारासोबत फक्त पाच व्यक्तींना कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. इतरांना मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अडविण्यात येईल. यासाठी पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकार्‍याच्या नियंत्रणाखाली मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात असेल. 4 एप्रिल ही उमदेवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!