आ.एकनाथराव खडसेंमुळे शेतकर्‍यांना मिळाला न्याय

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी-जळगाव- भुसावळ दरम्यान तिसर्‍या रेल्वे लाईनसाठी भूसंपादनाचा मोबदला वाढवून मिळावा, प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी जाहीर केलेला भूसंपादन अवॉर्ड रद्द करून, नव्याने जाहीर करावा, या मागणीसाठी दि. 10 जुलैपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असोदा, नशिराबाद येथील 58 शेतकर्‍यांनी उपोषण सुरू केले होते.
आज माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी थेट मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद घडवुन आणला. दरम्यान माजी मंत्री आ. खडसेंच्या यशस्वी मध्यस्थीमुळे हे उपोषण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाअंती जिल्हा प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी सोडविले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 10 जुलैपासुन उपोषणाला बसलेल्या शेतकर्‍यांची माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी भेट घेतली होती.

त्यांनी जिल्हाधिकारी, रेल्वेचे अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. भूसंपादन निवाडा रद्द करण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून आंदोलकांच्या भावना कळविल्या होत्या. त्यावर पालकमंत्र्यांनी निवाडा रद्द करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते.

मात्र जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्ताव पाठविताना निवाडा रद्दचा उल्लेख न करता प्रस्ताव तयार केला असल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरूच ठेवले होते. या उपोेषणकर्त्यांपैकी आसोदा येथील वंदना बर्‍हाटे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना आज उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

माजी मंत्री आ. खडसेंची मध्यस्थी यशस्वी
आज सायंकाळी मुंबईत माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवाडा रद्द करण्याच्या शेतकर्‍यांच्या भावना असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांशी बोलणे करून निवाडा रद्द करण्याचे सांगितले. शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन शेतकर्‍यांना निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडकेंना उपोषण स्थळी जाऊन मोबाईलवर शेतकर्‍यांशी बोलणे करून देण्यास सांगितले. श्री.मुंडकेंनी उपोषण स्थळी जाऊन स्पीकर ऑनकरून शेतकर्‍यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद घडविला. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकर्‍यांनी उपोषण मागे घेतले आहे. उपोषणात रमेश चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, किसन झटके, चुडामण चौधरी, नरेंद्र नारखेडे, योगेश बर्‍हाटे, मधुकर कावळे, पद्माकर बर्‍हाटे, अशोक अलकरी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, बाबूराव पाटील, रामचंद्र कुंभार, संतोष अस्वार, डिगंबर कावळे, संजीव कावळे, भागवत पाटील, दिनेश अत्तरदे, गोपाळ भोळे, श्रीकांत भोळे, अरुण देवरे, निळकंठ देवरे, मिलिंद कौंडिण्य, प्रशांत पाटील, सुभाष कोळी, नारायण माळी, रवींद्र पाटील, पंढरीनाथ बर्‍हाटे, संदीप नारखेडे आदी सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

*