Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

कुलभूषण जाधव यांना भारतात आणण्यात यश मिळेल : शिक्षण मंत्री विनोद तावडे

Share
मुंबई |  कुलभूषण जाधव यांची फाशी थांबविण्यात भारताला यश आले आहे. सध्या त्यांच्या खटल्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरु आहे, लवकरच कुलभूषण जाधव यांना पुन्हा भारतात आणण्यात नक्कीच यश येईल असा आशावाद व्यक्त करतानाच शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, मुंबई बॉम्बस्फोट खटल्य़ाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम भारतात यायला तयार असताना दाऊदला तुम्ही का येऊ दिले नाही असा सवाल करणा-या रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रश्नावर तुम्ही काहीच का बोलत नाही असा थेट सवालही श्री.तावडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज केला.

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर वायूदलाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना संपर्क करुन पाकिस्तानच्या भूमीवरील लष्कर-ए-तैय्यबाच्या प्रशिक्षण स्थळांवर सरकारला सर्जिकल स्ट्राइक/एअर स्ट्राइक करण्याचा प्रस्ताव ठेवला होता पण त्यावेळी कोणाच्या दबावाखाली येऊन पंतप्रधानांनी कारवाई न करण्याचा हा निर्णय घेतला होता व तत्कालीन युपीए सरकाराने शेपूट का घातले हे तुम्ही आता जनतेला स्पष्ट करावे असे आवाहनही तावडे यांनी यावेळी केले.

काल कराड येथील महाआघाडीच्या प्रचार सभेत शरद पवार यांनी केलेल्या टिकेला विनोद तावडे यांनी आज सडेतोड उत्तर दिले. प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले की, भारताच्या प्रयत्नांमुळे जाधव यांना त्यांची पत्नी व कुटुंबाला भेटता आले. भारताचे ज्येष्ठ वकिल हरीष साळवे न्यायालयात त्यांची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. त्यामुळे कुलभूषण जाधव यांची चिंता तुम्ही करु नका, आमचे मोदी सरकार ते सक्षमपणे करेल आणि त्यांना पुन्हा भारतात आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुलवामा हल्ल्यानंतर सैन्याने केलेल्या एअर स्ट्राईकचे राजकारण करुन मोदीजी त्याचे क्रेडिट घेत आहेत या शरद पवार यांच्या आरोपावर बोलताना तावडे म्हणाले की, हल्ल्याचे पुरावे मागितले विरोधी पक्षवाल्यांनीच.. हे करायची काय गरज होती असे सॅम पित्रोदा बोलले.

एकीकडे स्वत: पुरावे मागायचे, कारवाईचे आकडे मागायचे आणि ज्यावेळी एखादा हल्ला झाल्यानंतर त्या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर मोदी सरकारने दिल्यानंतरही हेच विरोधी पक्ष सरकार आणि मोदीजींवर निषाणा साधत आहेत. विशेष म्हणजे अतिरेक्यांच्या हल्ल्याला मोदी सरकार यांनी दमदार प्रत्युत्तर दिले, त्या कारवाईचे क्रेडीट तर द्यायचे नाही व हल्ल्याचे पुरावे मात्र मागायचे हा पवार यांचा दुटप्पीपणा असल्याचा आरोपही श्री. तावडे यांनी केला.

२६/११ च्या दहशतवादी हल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करायचे सोडून उलट २०१० मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी केलेल्या २५ कट्टर दहशतवाद्यांना “गुडवील जेस्चर” म्हणून मुक्त केले होते. याच २५ दहशतवाद्यांपैकी शाहीद लतिफ या दहशतवादयाने पठाण कोटवरील २०१६ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती असे निदर्शनास आणून देताना तावडे म्हणाले की, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्वीजय सिंह यांनी एक “ॲक्सीडेंट” म्हणून केला.

याच दिग्वीजय सिंह यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्यात पाकिस्तानला “क्लीन चिट” दिली होती. तसेच ओसामा बिन लादेनचा उल्लेख “शांतता दूत” म्हणूनही केला होता. २००८ मधील दिल्लीच्या “बाटला हाऊस एनकाऊंटर” मध्ये ठार झालेल्या इंडियन मुजाहिदिनच्या दहशतवाद्याच्या आजमगड येथील घरी जाऊन दिग्वीजय सिंह यांनी त्या दहशतवाद्याच्या कुटुंबियांची भेट घेतली हेाती अशी टिकाही तावडे यांनी केली.

काँग्रेस पक्षातच त्यांच्या नेत्यांची आता पळापळ सुरु झालेली आहे. वसंतदादांचे नातू प्रतिक पाटील यांनी पक्ष सोडला, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चिरंजीवाने पक्ष सोडला, प्रिया दत्त यांना लढायचे नव्हते, मिलींद देवरा हे देखील लढायला उत्सुक नव्हते. पुण्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवस बाकी असताना अजूनही तेथील उमेदवार ठरत नाही.

आता अनंत गाडगीळ म्हणतात की, माझे नाव गाडगीळ नसते तर मी देखील काँग्रेस पक्ष सोडला असता. अशोक चव्हाण यांनाही मनाविरुध्द निवडणूक लढवावी लागतेय. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे ‘शोक पर्व’ आता सुरु झाले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात एकही जागा मिळणार नाही अशी अवस्था आता दिसत आहे, असा टोलाही तावडे यांनी मारला.

गेल्या खेपेस नरेंद्र मोदी यांना फक्त ३१ टक्के मते मिळाली होती. आता सर्व विरोधी पक्षांची एकजूट झाली आहे. त्यामुळेच यंदा भाजपाचा पराभव होणार आहे असे स्वप्न पाहणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना तावडे म्हणाले की, महिनाभरापूर्वी मोदी यांच्या विरोधात दिल्लीमध्ये हातात हात घालून सर्व नेते उभे राहिल्याचा फोटो आम्ही पाहिला होता.

पण आता चित्र वेगळे आहे. आता मात्र ममता वेगळया लढत आहेत. मायावती वेगळया लढत आहेत. सपाही वेगळे लढत आहे. सगळे आपापले लढत आहेत असे असताना असे चूकीचे स्वप्न पाहणे पृथ्वीराज बाबा यांनी आता सोडावे आणि महाआघाडीच्या कालच्या प्रचारसभेच्या मंचावर अजितदादा का नव्हते याची माहिती घ्या, म्हणजे कळेल की तुम्ही नुसते निवडणुकांसाठी एकत्र आलात की मनाने एकत्र आलात अशी टिप्पणीही श्री. तावडे यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!