धरणगावात शिवसेना-भाजपात राडा

0
धरणगाव । दि.14 । प्रतिनिधी-शहरातील शिवसेना-भाजपामधील अंतर्गत धुसफूस गंभीर वळणावर आली. दोन्ही पक्षातील पदाधिकार्‍यांमध्ये आज दुपारी 4 वाजता राडा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
रात्री उशिरापर्यंत समेटाचे प्रयत्न झाले मात्र, हे प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेर 16 जणांविरुद्ध परस्परविरोधी दंगलीचा गुन्हा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपात धुसफूस सुरु होती. यातूनच आज दोन्हीकडील पदाधिकारी दुपारी बसस्थानकासमोर आमने-सामने आले.

यातून दोन्ही गटात लाथा-बुक्के, लाठ्या-काठ्यांनी मारहाण झाल्याचा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आला आहे. वेळीच दोन्ही पक्षातील ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.

दरम्यान, हा वाद पोलिसात स्टेशनला गेला. याठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, वासुदेव चौधरी, विलास महाजन, भाजपा नेते पी.सी.आबा पाटील, संजय महाजन, चंद्रशेखर पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते पोलीस बसस्थानक परिसरात जमले होते. सुरुवातीला समेटाचा प्रयत्न झाला. मात्र, यात अपयश आल्याने शेवटी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत भाजपा नगरसेवक भालचंद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपल्यासह सहकार्‍यांना चर्चेसाठी बसस्थानकासमोर बोलाविण्यात आल्याचा निरोप मिळाला.

यावरुन आपण कांतीलाल माळी, दिलीप माळी, युवराज रायपूरकर यांच्यासह गेलो असता राहुल रोकडे, योगेश वाघ, महेंद्र महाजन, मोहन महाजन, भगवान महाजन, आर्या रोकडे तेथे उभे होते.

त्यांनी ‘आम्ही केलेल्या कामांच्या तुम्ही तक्रारी का करतात?’, असे विचारुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली व लाठ्या-काठ्या आणि हॉकीस्ट्रीकने मारहाण केली.

तेव्हा तेथे उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष संजय महाजन, पुनीलाल महाजन, सुरेश महाजन यांनी मध्यस्थी करुन सुटका केली.

या मारहाणीत आपल्याला डाव्या खांद्याला, कांतीलाल माळीच्या पाठीला, युवराज रायपूरकरच्या पायाला तर दिलीप माळी यांच्या उजव्या डोळ्या आणि ओठाला दुखापत झाल्याचे म्हटले आहे.

भालचंद्र माळी यांच्या फिर्यादीवरुन राहुल रोकडे, योगेश वाघ, महेंद्र महाजन, मोहन महाजन, प्रकाश महाजन, भगवान महाजन, आर्या रोकडे आदींविरुद्ध भा.दं.वि.कलम 143, 147, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा गुन्हा राहुल रघुनाथ महाजन यांच्या फि र्यादीवरुन दाखल करण्यात आला आहे. आपण बसस्थानकाकडून जात असतांना भाजपा नगरसेवक भालचंद्र जाधव यांनी शिविगाळ केली.

तेव्हा भूषण रमेश पाटील, कन्हैया रायपूरकर, महेश आहेरराव, दिलीप महाजन, कांतीलाल महाजन, किशोर चौधरी, शिरीष बयस, जितेंद्र महाजन, प्रवीण महाजन आदी तेथे उपस्थित होते.

‘आपल्याला शिवीगाळ का करता?’, अशी विचारणा करण्यासाठी गेलो असता, दिलीप महाजन व कांतीलाल महाजन यांनी योगश वाघ यांना मारहाण केली.

महेश अहेरराव, प्रवीण महाजन, किशोर चौधरी, शिरिष बयस यांनी पकडून लाथा-बुक्यांनी मारहाण केली. जितेंद्र महाजन यांनी योगेशला चाकू मारण्याच्या प्रयत्न केला. मात्र, राजेंद्र वाघ यांनी तो हिसकावून घेतला.

भालचंद्र जाधव यांनी वखराची पास मारण्यासाठी काढली तेव्हा सेना नगरसेवक वासुदेव चौधरी यांनी ती हिसकावून घेतली. याप्रसंगी सेना पदाधिकारी विलास महाजन, नगरसेवक भागवत चौधरी यांनी मध्यस्थी करुन सुटका केली.

या मारहाणीत आपल्या छाती, पाठ आणि पायाला, योगेश वाघ यांच्या हात, ओठला तर भैय्याच्या पाठ आणि पोटाला मार लागल्याचे राहुल महाजन यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.

त्यांच्या फिर्यादीवरुन भालचंद्र जाधव, भुषण पाटील, कन्हैय्या रायपूरकर, महेश अहिरराव, दिलीप महाजन, कांतीलाल महाजन, किशोर चौधरी, शिरिष बयस, जितेंद्र महाजन, प्रवीण महाजन यांच्याविरुद्ध भा.दं.वि.कलम 143, 147, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेना-भाजपातील या राड्यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नव्यानेच रूजू झालेले पो.नि.बी.डी.सोनवणे यांनी संयमीभूमिका घेतली.

पोलिस स्टेशन परिसरात मध्यरात्रीपर्यंत असंख्य कार्यकर्त्यांची गर्दी होती. रात्री 11 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास पो.नि.बी.डी.सोनवणे व सहकारी करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*