पोषण आहाराचा ठेका रद्द : सीआयडी चौकशीचा ठराव

0
जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पोषण आहाराचा ठेका रद्द करून याबाबत सीआयडी चौकशी करण्यात यावी असा ठराव सत्ताधारी- विरोधकांकडून करण्यात आला.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष ना. उज्वला पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सभापती, अधिकारी, सदस्य उपस्थित होते.
सभापती निवड, खातेवाटप व सदस्य निवडी नंतरची ही पहिलीच सभा असल्याने सभेत चांगलाच गदरोळ निर्माण झाला. जिल्हयातील सर्व शाळांमध्ये पुरविला जाणारा पोषण आहाराचा माल निकृष्ट दर्जा असल्याचे उघड झाले आहे.

सीईओंनी शाळांची तपासणी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्यात यावा अशा सुचना देखील दिल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह अधिकार्‍यांनी शाळांची तपासणी केली असता, अनेक शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार आढळून आला.

त्या अनुषंगाने आजच्या सर्वसाधारण सभेत सदस्या पल्लवी सावकारे, माधुरी अत्तरदे, रवींद्र नाना पाटील, जयपाल बोदडे, कैलास सरोदे यांनी पोषण आहाराचे नमुने सभागृहात अध्यक्ष, सीईओ यांच्यांकडे सादर केले.

यावेळी पल्लवी सावकारे यांनी पोषण आहाराच्या ठेकेदाराला मुदतवाढ देवून नये आदेश असतांना मुदतवाढ कशी देण्यात आली? असा प्रश्न उपस्थित केला.

ठेकेदार व शिक्षण विभागाच्या संगणमताने पोषण आहाराचा भष्ट्राचार सुरु असून याबाबत सीईओंना गांभीर्य नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

यावर सीईओ यांनी हा माझ्या अधिकारातील विषय नसून याबाबत पोषण आहाराच्या मालात शासनाचे अर्थिक नुकसान होत असल्याचे यापूर्वीच शासनाला कळविले असल्याचे सांगितले.

यावेळी सदस्यांनी पोषण आहाराचा ठेका रद्द करून सीआयडी चौकशी करण्यात यावी असा ठराव सर्वानुमते करण्यात आला. हा ठराव शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सीईओंनी यावेळी सांगितले.

आ. सतिष पाटील यांनी सीईओंकडे पोषण आहारबाबतची माहिती मागितली होती. अद्याप सीईओ तसेच शिक्षण विभागांकडून कुठलीही माहिती देण्यात आली नसून प्रशासन दिरंगाई करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य रवींद्र पाटील यांनी केला.

यावेळी पोषण आहाराच्या मुद्दयावरून सदस्यांनी शिक्षणाधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच एका शिक्षकांच्या बदलीबाबत माहिती देण्यात यावी अशी मागणी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केली.

 

LEAVE A REPLY

*