# Video # भुसावळकरांनी अनुभवली बहारदार संगीत मैफिल

 मराठे कुटुंबीय आणि स्वर निनाद सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम

0
भुसावळ । प्रतिनिधी : येथील मराठे कुटुंबीय आणि स्वर निनाद सांस्कृतिक मंडळातर्फे २३ मार्च रोजी सायंकाळी एका बहारदार संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. निमित्त होते कै. सतीश मराठे यांच्या सहाव्या पुण्यतिथीचे.

कै. सतीशजी मराठे हे स्वतः एक उत्तम ट्रंपेट वादक होते. कलेचे निस्सीम उपास क व कलाकारांवर नितांत प्रेम करणारे असे हे एक दिलदार व्यक्तिमत्त्व होतं. सतीशजींच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नी, मुले, इतर कुटुंबीय व सर्व कलाप्रेमी भुसावळकर मंडळी मिळून दर वर्षी हा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ करतात. ह्या वर्षी आयोजित केलेल्या ‘स्वर सुमनांजली’ कार्यक्रमात डोंबिवली येथील तरूण आघाडीचे कलाकार  समीर अभ्यंकर ह्यांना पाचारण केले होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात समीर अभ्यंकर ह्यांनी राग केदारने केली. त्यात ‘बन ठन कहा’ हा विलंबित एकतालातील ख्याल समीरजींनी अप्रतिम रंगवला. त्यापुढे समीरजींनी ह्याच रागातील ‘गोरी हट जी न करीये’ ही द्रुत तीनतालातील बंदिश सुंदरतेने नटवली. त्यानंतर बसंत बहार रागात ‘आयी ऋत बसंत की’ ही द्रुत एकतालातील एक बंदिश श्री. समीर अभ्यंकर ह्यांनी सादर केली. ही रचना पं. रघुनाथ भागवत ह्यांची आहे.

बसंतबहारच्या अतिशय तडफदार पेशकशीला श्रोत्यांची विशेष दाद मिळाली. त्यानंतर ‘माझे माहेर पंढरी’ हा एक लोकप्रिय अभंग समीरजींनी सादर केला. त्यात रसिक श्रोते भक्तीरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर होळीच्या पाश्वर्भूमीवर समीरजींनी देस रागात ‘रंग रसिया’ ही एक होरी सादर केली.

ह्या प्रभावी सादरीकरणानंतर कार्यक्रमाच्या शेवटी समीर अभ्यंकर ह्यांनी परमपूज्य  नाना महाराज तराणेकर ह्यांच्यावर रचलेली भैरवी रागातील रचना ‘नाना दर्शन दिजो’ अतिशय भावपूर्णतेने सादर केली. ह्या उत्तरोत्तर रंगलेल्या मैफिलीत समीरजींनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ चा गजर करून कार्यक्रमाची सांगता केली.

ह्यावेळी  मनोज कुळकर्णी (तबला) व  जितेश मराठे (संवादिनी) ह्यांनी समीरजींना अतिशय अप्रतिम साथसंगत केली. उत्तम कलाकाराला तितक्याच ताकदीची संगत मिळाली तर काय बहार येते ह्याचा अनुभव ह्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित रसिक श्रोत्यांना मिळाला. तसेच तानपुऱ्यावर जितेश मराठे ह्यांच्या शिष्या प्रियांका पाटील ह्यांनी छान साथ केली.

नीटनेटक्या आयोजनाबरोबरच ध्वनी व्यवस्था देखील खूप छान होती. तसेच ब्राह्मण संघाने ह्या कार्यक्रमासाठी त्यांचा हॉल देउन मोलाची मदत केली. असा कार्यक्रम दर वर्षी व्हावा असा मानस मराठे कुटुंबियांनी ह्यानिमित्ताने व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*