Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

गिरणेच्या आवर्तनासाठी शेतकर्‍यांचा एल्गार

Share
जळगाव । प्रतिनिधी : धरगणाव व जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची मोठी समस्या उद्भवली असून ही समस्या सोडविण्यासाठी व ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण थांबविण्यासाठी गिरणेच्या आवर्तनाचे पाणी नंदगाव व चोरगाव पर्यंत सोडावे, ही मागणी करीत शेकडो शेतकर्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यानंतर या शेतकर्‍यांनी अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या व त्यांना सविस्तर महिती दिली. पाणी नसल्याने गुरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

अनेक गांवाचा पाणीप्रश्न सुटणार

पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या उद्भवली आहे. आता पाच ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गिरणेचे आवर्तन सोडताना बंधार्‍यांमध्ये हे पाणी न अडकता थेट आल्यास आगामी तीन महिन्यांसाठी पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. आम्ही शेतीसाठी पाणी मागतच नाही, तर पिण्यासाठी मागतोय, असेही शेतकरी व पदाधिकार्‍यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, अंजनी नदीवरी दहिगाव बंधार्‍यात जर आवर्तन सोडले तर 36 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे, अशीही मागणी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी यांनी केली. दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी सरपंच पवार यांच्याकडून सर्व माहिती घेऊन नोट करून घेतली. तसेच पाणी प्रश्न सोडविण्यासंदर्भात आश्वासीत केले. अनेक गावांच्या पाणीपुरवठा विहिरी नदीजवळ असल्याने मोठी समस्या सुटणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांनी घेतली माहिती

शेतकर्‍यांच्या मागणीनंतर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी तत्काळ जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांची दुपारी बैठक घेतली. या बैठकीत पाण्याचे कसे नियोजन आहे. किती गावे आहेत, एकूण लोक किती, किती गावांना फायदा होईल, केवळ पाण्याचा प्रश्न सुटेल की सिंचनाला पण उपयोग होईल, यासह विविध बाबींची माहिती घेत ग्रामस्थांना पाणीटंचाई भासू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे पाणी सोडण्याच्या बाबतीत जिल्हा प्रशासन लवकरच काहीतरी सकारात्मक भूमिका घेईल, अशी शक्यता असल्याचे सचिन पवार यांनी सांगितले.

तासाभरात हालचाली

शेकडो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यातयात आल्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची भेट घेण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी पाच लोकांच्या शिष्टमंडळाला आत बोलावून चर्चा केली. टंचाई आराखडा आणावा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना भेटून यासंदर्भातील कार्यवाही करावी, थेट निवेदनावर मागणी मान्य होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकार्‍यांनी मांडली व शेतकर्‍यांना सीईओंची भेट घेऊन निवेदन देण्याचे सांगितले.

12 वाजेच्या सुमारास शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते. त्यानंतर शेतकर्‍यांनी मोर्चा जिल्हा परिषदेकडे वळविला. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांची भेट घेऊन माहिती दिली. शेतकरी माहिती देत असतानाच संजय मस्कर यांच्या मोबाईलवर जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला व तीन वाजता पाणी प्रश्न सोडविण्यासाठी बैठक असल्याने उपस्थित राहण्याचे त्यांना कळविण्यात आले.

निवेदनाच्या अगदी तासाभरातच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी हा प्रश्न सोडविण्यासंदर्भात हालचाली केल्याने, शेतकर्‍यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

यांची होती उपस्थिती

नांद्रा, रेल, लाडली, चांदसर, कवठड, चोरगाव, फेसर्डी, नंदगाव, पिलखेडा आदी गावांच्या शेतर्‍यांसह जिल्हा परिषदेचे सदस्य गोपाळ चौधरी, चांदसरचे सरपंच सचिन पवार, महेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, सुनील पाटील, शांताराम पाटील, गजानन पाटील, पंडित पाटील आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!