पोषण आहारातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी

0
भुसावळ | प्रतिनिधी :  जळगाव जिल्ह्यातील जि.प. शाळांमधील शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जि.प. उपगटनेता तथा शिक्षण समिती सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण समिती सभापती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या १५ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील शालेय पोषण आहारात प्रचंड सुरू असलेला भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. जि.प. मध्ये सत्ताधारी असणार्‍या पक्षाच्याच जि.प. सदस्याने ही अनागोंदी प्रकाशात आणली.

परंतु यासंदर्भात कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. सत्ताधार्‍यांनाच न्याय मिळत नसेल तर विरोधकांच्या विषयाचे काय? त्यासाठी जळगाव जि.प. शाळांमध्ये शालेय पोषण आहारात होत असलेल्या भ्रष्टाचारात सहभागी अधिकारी, कर्मचारी, पुरवठादार, कंत्राटदार, राजकीय सूत्रधार अशा सर्वांची कसून चौकशी करण्यात यावी. चौकशीअंती सत्य उजेडात येईल.

दोषी आढळलेल्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दि. १२ जुलै २०१७ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जि.प. सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी खडका येथील जि.प. शाळेत जावून शालेय पोषण आहारासाठी पुरविण्यात आलेल्या धान्याचे नमुने घेतले.

हे धान्यही त्यांना नित्कृष्ट आढळून आले. त्यामुळे या प्रकरणातील भ्रष्ट व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येवून कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा उपोषण करण्याचा इशाराही जि.प. उपगटनेता तथा शिक्षण समिती सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*