वांजोळा येथेही शालेय पोषण आहारात निघाल्या अळ्या

0

जळगाव | प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथील शाळेतील शालेय पोषण आहारातील तांदळामध्ये अळ्या, धनुरे, तर वटाणे हे ओले निघाल्याने जि.प. उपाध्यक्ष नंदु महाजन व सदस्या सावकारे यांनी तत्काळ शिक्षणाधिकार्‍यांना फोन करुन निकृष्ट पोषण आहार पुन्हा शाळेत दिला कसा? असा सवाल करीत शिक्षण विभागाचे धिंडवडे काढले.

आगामी जि.प. सर्व साधारण सभेत यावर सवाल उपस्थित करुन शिक्षण विभागाला जाब विचारणार असल्याचे पल्लवी सावकारे यांनी सांगितले. दरम्यान, शिक्षणाधिकार्‍यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना या शाळेत पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले.

पल्लवी सावकारे यांनी वांजोळा येथील निकृष्ट आहाराबाबत वरिष्ठांना माहिती दिल्याने शिक्षण विभागाकडून काल वांजोळा येथे नवीन माल पाठविला असल्याची माहिती शिक्षणविभागाकडून मिळाल्याने तेथे जि.प. उपाध्यक्ष नंदु महाजन, जि.प.सदस्या पल्लवी सावकारे, वांजोळा येथील सरपंच नरेंद्र पाटील यांनी दि. १२ रोजी भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथील शाळेला भेट देऊन शालेय पोषण आहाराची पाहणी केली असता तांदुळ, वटाणे, डाळ आदी साहित्यामध्ये उंदराच्या लेंड्यांसह अळ्या निघाल्या.

त्यामुळे पूर्वीच्या शालेय आहारापेक्षाही हा आहार निकृष्ट असल्याने शिक्षण विभाग मुलांच्या जीवाशी खेळ करीत असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

जि.प.सदस्या सावकारे म्हणाल्या की, पूर्वीच्या धान्यापेक्षाही आज पुरविण्यात आलेले नवीन शालेय पोषण आहार हा निकृष्ट असून तो गुरांना खायला देण्यासारखासुध्दा नाही़ तेच धान्य देशाच्या भावी पिढीला खाऊ घालतात हि लाजीरवाणी बाब असून याविरोधात दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सीईओंकडे केली आहे.

भुसावळ तालुक्यातील निकृष्ट पोषण आहाराबाबत शिक्षणाधिकारी यांनी ३ जुलै रोजी धान्य बदलण्याचे आदेश तालुकास्तरावर दिले होते. त्यानंतर आज दि. १२ रोजी धान्य बदलण्यात आले; मात्र ते पूर्वीपेक्षाही अतिशय निकृष्ट असल्याने त्याबाबत शिक्षणाधिकार्‍यांना जाब विचारला असता त्यांनी गटशिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख श्रीखंडे यांना पाठविले याठिकाणी असता त्यांनीही शालेय पोषणात अळ्यासह धनुरे असल्याने तो आहार निकृष्ट असल्याचे सांगितल्याने त्याचे सॅम्पल काढून पंचनाम्यासाठी पाठविण्यात आले आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ – रवींद्र शिंदे

शालेय पोषण आहाराचा आवक जावक क्रमांक नाही, कोणी माल दिला, कोणी घेतला, तसेच कोणत्या तारखेला दिला याबाबत कोणतीही माहिती न देता नेहमी एकच माहिती देऊन प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी फक्त वेळकाढूपणा करीत असल्याचे आरोप तक्रारदार रवींद्र शिंदे यांनी केला.

शालेय पोषण आहाराबाबत मागितलेली माहिती योग्य न देता त्यात नेहमीच गोडबंगाल असते. त्यामुळे तक्रारदार शिंदे यांनी शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीबाबत मला जी माहिती हवी होती ती न देता वेगळीच माहिती देऊन शिक्षण विभाग काय साध्य करतेय? असे उपशिक्षणाधिकार्‍यांना एका लेखी पत्राव्दारे सांगितले.

राष्ट्रवादीच्या जि.प.सदस्यांचा उपोषणाचा ईशारा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जि.प. सदस्य रविंद्र पाटील यांनीही खडके जि.प. शाळेला भेट देवून तेथील पोषण आहाराची पाहणी केली असता धान्य निकृष्ट असल्याचे आढळून आले.

त्याचे नमुने देखील त्यांनी सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांना दिले. तसेच शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचार सत्ताधार्‍यांनीच उघडकीस आणला असून त्यांनाच न्याय मिळत नसेल तर विरोधकांना काय न्याय मिळेल? असा प्रश्‍न उपस्थित करुन भ्रष्ट अधिकारी व व्यक्तींवर कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा जि.प. सदस्य रविंद्र पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

LEAVE A REPLY

*