टपाल सेवा महागणार

0

नवी दिल्ली |  वृत्तसंस्था :  तंत्रज्ञानाच्या युगात टपाल विभागाच्या अजूनही सेवा वापरात असाल तर आता अधिक पैसे मोजण्यासाठी तयार रहावे लागणार आहे. टपाल विभागाने पोस्टकार्ड, अंतर्देशीय आणि लिफाफ्याच्या किमतीत वाढ करण्याची तयारी केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या कार्यालयाने मंजुरी देताच नवीन दर लागू होतील.

टपाल विभागाच्या प्रस्तावाला पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यास २५ पैसे दराने मिळणारे पोस्टकार्ड १ रुपया, ५० पैशाचे मेघदूत पोस्टकार्ड २ रुपये, ६ रुपयांची बिझनेस पोस्टकार्ड ७ रुपये, अडीच रुपयांचे अंतर्देशीय पत्र ४ रुपये आणि ५ रुपयांचा लिफाफा ७ रुपयांना मिळेल.

नोंदणीकृत टपाल दरातही सुधारणा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या नवीन प्रस्तावाने सध्या प्रत्येक ५० गॅम वजनाला १ रुपये आकारण्यात येतील. सध्या हा दर २५ पैसे आहे. टपाल विभागाला होणार्‍या तोट्याचा विचार करून हे नवीन दर ठरवण्यात आले आहेत.

गेल्या १६ वर्षांत टपाल विभागाकडून कोणतेही दर बदलण्यात आलेले नाहीत. यापूर्वी २००१-०२ मध्ये हे दर बदलले होते. १६ वर्षांत कागदाच्या किमतीत वाढ झाली, मालवाहतुकीचा खर्च वाढला.

टपाल विभागाचाही खर्च अडीच पटीने वाढला. यामुळे विभागाला आर्थिक फटका बसतो. नवीन दर लागू करण्यासाठी सरकारकडून १ हजार कोटी रुपये देण्यात येतील असा अंदाज आहे, असे सरकारी अधिका़र्‍याने सांगितले.

उत्पन्नात वाढ

२०१३-१४ मध्ये विभागाचे उत्पन्न केवळ १०० कोटी रुपये होते. मात्र ई-व्यापार कंपन्यांच्या सामानाचा पुरवठा करण्यासाठी करार झाल्याने यात वाढ झाली. विभागाचे उत्पन्न २०१४-१५ मध्ये ५०० कोटी आणि २०१५-१६ मध्ये १,३०० कोटी रुपयांवर पोहोचले.

LEAVE A REPLY

*