राष्ट्रवादीची दिशाहीन‘दादा’गिरी

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-एकेकाळी सहा आमदारांसह दबदबा असलेल्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची ‘दादा’गिरी विरोधाची धार बोथट झाल्याने अलीकडच्या काळात दिशाहीन झालेली दिसते.
त्यामुळे प्रदेश राष्ट्रवादीने आता संघटनात्मक फेरबदलाचे संकेत दिले असून उद्या दि. 13 रोजी माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्या दौर्‍याकडे विशेष लक्ष लागून आहे.
सन 2009 मध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार होते. या आमदारांच्या बळावर राष्ट्रवादीने जिल्ह्यात आपला दबदबा निर्माण केला होता.
मात्र, त्यानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा बँक, नगरपरीषद, जिल्हा दुध संघ, जिल्हा परीषद, या सर्वच निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सपाटून मार खाल्ला.

विधानसभा निवडणूकीत तर केवळ पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे डॉ.सतिष पाटील हे एकमेव आमदार म्हणून निवडुन आले.

त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद संपुष्टात आली. दुसरीकडे भाजपाने या सर्वच निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारून जिल्ह्यावर पुन्हा आपले वर्चस्व सिध्द केले.

जिल्हा परीषदेत तर राष्ट्रवादीचे तीन सदस्यच भाजपाने अप्रत्यक्षरित्या पळवून नेल्याने राष्ट्रवादीची सत्तेची संधी हुकली. या तीन सदस्यांवर अद्यापही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही.

काँग्रेसची अवस्था तर बिकटच आहे. विरोध कुणाला करावा? का करावा? या विषयी काँग्रेसचे पदाधिकारीच संभ्रमावस्थेत आहेत.

केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना जिल्ह्यातही भाजपाला विरोध करीत असून विरोधकाची भुमिका पार पाडत आहे.

राष्ट्रवादीकडे आता माजींची फौज उभी राहिली असून ही फौज केवळ एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या कामातच धन्यता मानत आहे.

मध्यंतरी कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी मोठे आंदोलन उभारले. या आंदोलनाला विरोधक म्हणून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून फारसे बळ मिळाले नाही.

त्यामुळे संपाचा हवा तेवढा परीणाम जिल्ह्यात जाणवला नाही. राष्ट्रवादीने आंदोलने केली मात्र, ती फारसी प्रभावी ठरली नाही.

जिल्ह्यात भाजपाचा वाढता प्रभाव त्याला कारणीभूत ठरत असल्याची चर्चा खुद्द राष्ट्रवादीत दबक्या आवाजात होत आहे.

सोशल मिडीयावरच विरोध
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी रस्त्यावर उतरण्यापेक्षा सोशल मिडीयावरूनच अधिक विरोध करतांना दिसून येतात. प्रत्यक्षात जनतेत जाऊन जनतेसाठी आंदोलन उभारण्याविषयी या पदाधिकार्‍यांमध्ये मोठी उदासिनता असल्याचेच चित्र आहे.

खांदेपालटाची चर्चा
दिशाहीन झालेल्या जिल्हा राष्ट्रवादीत आता खांदेपालटाची गरज असल्याचे पक्षांतर्गतच दबक्या आवाजात चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, प्रांताध्यक्ष आ. सुनिल तटकरे व माजी विधानसभाध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील हे उद्या दि. 13 रोजी जळगाव दौर्‍यावर येत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील यांनीही फेरबदलाचे संकेत दिले असल्यामुळे राज्यनेत्यांच्या या दौर्‍याकडे आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

 

LEAVE A REPLY

*