आम्ही कुटुंबासह रेल्वेखाली आत्महत्या करु !

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-असोदा, नशिराबाद, तरसोद येथील शेतकर्‍यांना सध्याचा भूसंपादन अवॉर्ड रद्द करून, जमिनीचा मोबदला नवीन भूसंपादन कायद्यानुसार न दिल्यास आम्ही कुटूंबासह रेल्वेखाली आत्महत्या करू असा इशारा आसोदा, नशिराबाद येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना आज दिला.
दरम्यान उपोषणस्थळी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी शेतकर्‍यांची भेट घेऊन चुकिचा निवडा करणार्‍या प्रांताधिकार्‍यांना चांगलेच खडसावले.

असोदा, नशिराबाद, तरसोद येथील शेतकर्‍यांच्या जमिनी रेल्वेने तिसर्‍या रेल्वे मार्गासाठी संपादीत केल्या जाणार आहे. या जमिनीचा मोबदला प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी अत्यंत कमी जाहीर केल्याने आसोदा आणि नशिराबाद येथील शेतकर्‍यांनी दि. 10 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारले आहे.

आज उपोषणस्थळी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्यासह खा. ए.टी.पाटील यांनी शेतकर्‍यांची भेट घेतली. याठिकाणी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, रेल्वेचे महाप्रबंधक आर.के. यादव यांना बोलावण्यात आले.

यावेळी आ. खडसे यांनी जिल्हाधिकारी व रेल्वेच्या महाप्रबंधकांशी दिडतास चर्चा केली. प्रांताधिकार्‍यांनी भूसंपादनाचा जाहीर केलेला अवॉर्ड रद्द करावा लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आ. खडसेंनी अधिकार्‍यांना खडसावले
चुकीचा निवाडा जाहीर करून शेतकर्‍यांवर अन्याय करणार्‍या प्रांताधिकार्‍यावर माजी मंत्री आ. एकनाथराव खडसेंनी चांगलेच खडसावले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनाही बघ्याची भुमिका घ्यावी लागली.

पालकमंत्र्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा
आ. एकनाथराव खडसेंनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून शेतकर्‍यांच्या उपोषणाबाबत माहीती दिली. आ. खडसेंनी रेल्वेचे अधिकारी, जिल्हा प्रशासनाची भूमिका सांगितली.

महामार्गाच्या परिसरात भुसंपादनाला जादा दर मिळतो, त्याच परिसरात एक किलोमीटरवर कमी दर दिल्याने शेतकर्‍यांचे कुटुंब उध्वस्त होणार आहे

.नवीन भूसंपादन कायद्यानुसार प्रचलित दराच्या पाच पट मोबदला न दिल्यास शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्याची भूमिका घेतली असल्याचे ना. चंद्रकांत पाटील यांना सांगितले.

त्यावर पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठवून निवाडा रद्द करण्याचे आश्वासन दिले. यावेळी खासदार ए.टी. पाटील, रेल्वेचे डीआरएम यादव, अभियंता रोहित थावरे, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके आदी उपस्थित होते.

कुटूंबासह आत्महत्येचा इशारा
शेतकर्‍यांनी आ. खडसेंशी शेतीच्या मोबादल्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिनीला भाव न मिळाल्यास आम्ही एक इंचही जमीन रेल्वे मार्गाला देणार नाही. हि जमीन आमची उपजिवीका आहे. परंतु विकासासाठी आम्ही ही जमीन देत असुन त्याला कमी किमत मिळाली तर आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल, आमची मुले उघड्यावर पडतील. योग्य मोबदला न मिळाल्यास आम्ही रेल्वे मार्गावर कुटुंबासह बसून आत्महत्या करू, असा ईशारा शेतकर्‍यांनी आ. खडसेंशी चर्चा करतांना प्रशासनाला दिला.

 

LEAVE A REPLY

*