पारदर्शकता वाढविण्यात जीएसटीची मदत

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-वस्तु व सेवा कर अर्थात जीएसटी कायद्याचा सर्वसामान्य ग्राहकाना मोठया प्रमाणात फायदा होणार असून या कायद्यामुळे देशाचा मानव विकास निर्देशांक आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज केले.
भारत सरकारच्या वस्तु व सेवा कर आयुक्तालय, नाशिकच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात डॉ. भामरे यांनी वस्तु व सेवा कायद्याबाबत जिल्हयातील विविध व्यापारी संघटना व व्यापार्‍यांशी चर्चासत्राच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, नाशिक विभागाचे वस्तु व सेवा कर आयुक्त आर. पी. शर्मा, सहआयुक्त डॉ. पी. के. राऊत, अमोल खोत, उपायुक्त एस. पी. सिंग, उदय वाघ आदि उपस्थित होते.

यावेळी डॉ. भामरे म्हणाले की, वस्तु व सेवा कर कायदा लागू करण्यापूर्वी देशात केंद्र व राज्य सरकारचे विविध कर लागू होते.

केंद्र व राज्य सरकारचे मिळून 17 प्रकारचे कर आणि 22 प्रकारचे सेस एकत्र करुन वस्तु व सेवा कर कायदा लागू करण्यात आला आहे.

या कायद्यामुळे व्यवहारात पारदर्शकता येणार असल्याने याचा सर्वात अधिक फायदा हा ग्राहकांना होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक देश, एक कर प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहिर केल्यामुळे देशात पारदर्शकता वाढणार असून यामुळे देशाचा महसुल वाढणार आहे.

त्यामुळे भविष्यात कर्ज काढून विकास करण्याची पध्दती बदलण्यासही मदत होणार आहे. सर्वसामान्य ग्राहक, व्यापारी यांच्या हिताच्या या निर्णयामुळे आपण सर्वांनी या कायद्याचे स्वागत केले पाहिजे.

प्रधानमंत्र्यांनी डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडियाचे स्वप्न बघितले आहे. खेड्यापर्यंत स्मार्ट फोन पोहोचल्यामुळे सर्वांनी डिजिटल होत नवीन तंत्रज्ञान स्वीकारावे.

व्यापार्‍यांनी ऑनलाईन प्रक्रियेला घाबरून न जाता वस्तु व सेवा कर केंद्राचे मार्गदर्शन घेऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

त्याचबरोबर मी तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आलो आहे. त्यामुळे आपल्या अडचणी सांगा, तुमचा प्रतिनिधी म्हणून अर्थमंत्र्यांशी यावर चर्चा करेल असे आश्वासनही डॉ. भामरे यांनी यावेळी व्यापार्‍यांना दिले.

देशाच्या मानव विकास निर्देशाकांवर जागतिक बॅकेची मदत अवलंबून असते. असे सांगून डॉ. भामरे म्हणाले की, या कायद्यामुळे सामान्य माणसांना फायदा होणार असल्याने देशाचा मानव विकास निर्देशांक वाढण्यास मदत होणार आहे.

तसेच देशात पारदर्शकता वाढण्यासही मदत होणार असल्याने आपण सर्व मिळून या कायद्याचे स्वागत करु या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयुक्त शर्मा यांनी या कायद्याची माहिती देतांना सुरुवातीला यामुळे व्यापार्‍यांना त्रास होणार असला तरी ऑनलाईन प्रक्रियेमुळे भविष्यात याचा फायदाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यापार्‍यांनी विचारलेल्या शंकांचे वस्तु व सेवा कर विभागाच्या अधिकार्‍यांनी सोप्या व सहज समजेल अशा शब्दात निरसण केले.या चर्चासत्रास जिल्हयातील व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक, कर सल्लागार व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*