Type to search

यासाठी शरदराव पवारांनी माढ्यातून माघार घेतली….

देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

यासाठी शरदराव पवारांनी माढ्यातून माघार घेतली….

Share
 पुणे  : पवार घराण्यातील मतभेद, बदललेली राजकीय परिस्थिती याचबरोबर राज्यसभेची गमवावी लागणारी जागा या तीन प्रमुख कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
याचबरोबर शरदराव पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत दाखविलेले स्वत:बद्दलच्या अनिश्चिततेचे धोरण कायम ठेवल्याचेही दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे चिरंजीव रोहित पवार सक्रिय झाले होते. रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असून, पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. रोहित पवार भविष्यात पवारांचा वारसा चालविणार, अशी चर्चाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली होती.

या चर्चेमुळे अजित पवार व त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे अस्वस्थ झाले होते. त्यातच, पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघामधून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली होती. पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघाचे दौरे सुरू केले होते. हे सुरू असतानाच, पवार यांनी अचानक माढ्यातून आपली स्वत:ची उमेदवारी जाहीर केली. त्यापूर्वी, पवारांनी पुणे लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढविता येईल का, याची चाचपणी केली होती.
आपली उमेदवारी जाहीर करतानाच, या लोकसभा निवडणुकीत आपण आणि आपल्या कन्या सुप्रिया सुळे हे दोनच पवार असतील, असे सांगण्यासही पवार विसरले नव्हते. साहजिकच, पार्थ पवार यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच अडचणीत आल्याची भावना अजित पवार समर्थकांमध्ये पसरली होती. शरदराव पवार यांनी हे स्पष्टीकरण दिल्यानंतरही पार्थ पवार यांचे मावळ लोकसभा मतदारसंघातील दौरे सुरूच होते.
अजित पवार यांनीही मावळमधील विविध पक्षातील राजकीय कार्यकर्त्यांशी संवाद साधून तयारी कायम ठेवली होती. पवार यांनी माढ्यातून उमेदवारी मागे घेण्यामागे पवार कुटुंबीयांतील तणाव हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. पवार यांनी माघार घेतल्यामुळे आता पार्थ पवार यांची मावळ लोकसभा मतदारसंघातील वाटचाल सुकर झाली असल्याचे मानले जाते.

माढा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत राजकीय परिस्थिती वेगाने बदलते आहे. २००९ मध्ये पवार यांनी येथून पहिल्यांदा निवडणूक लढवित आपला पारंपरिक बारामती मतदारसंघ कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी मोकळा करून दिला होता. २०१४ मध्ये मोदी लाट असताना मात्र पवारांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही, असे सांगत राज्यसभेवर जाणे पसंत केले होते. २०१४ मध्ये मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघातून विजयश्री खेचून आणली होती.

मात्र, अचानक पवार यांनी पुन्हा एकदा आपली उमेदवारी जाहीर केल्याने विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील प्रचंड नाराज झाले होते. एका बैठकीतून रणजितसिंह मोहिते पाटील संतापाने निघून गेल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. मोहिते पाटील यांना त्या मतदारसंघात खूप विरोध आहे असे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले गेल्याचा आरोप त्यांनी जाहीरपणे केला होता.
पवार यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक व निवृत्त प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांना माढ्यातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या दोन वर्षांत केली जात होती. फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांनाही प्रसंगी उमेदवारी दिली जाऊ शकते; पण मोहिते पाटील यांना नाही असे वातावरण केल्याचे मोहिते पाटील गटाचे म्हणणे होते.

पवार यांनी माढा मतदारसंघातून उमेदवारी स्वीकारली, तर गेल्या दोन वर्षांत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मतभेदांचा फटका त्यांना बसू शकेल, असे वातावरण तयार झाले होते. फलटणच्या कार्यकर्ता मेळाव्यात पवारांसमोरील कागद हिसकावून त्यांचे भाषण रोखण्यापर्यंत येथील कार्यकर्त्यांची मजल गेली होती.

तो प्रकार बघत बसण्यापलीकडे पवार काहीही करू शकले नाहीत. त्यामुळे, निवडणूक लढविली तर गटबाजी रोखण्यासाठी याच मतदारसंघात अडकून पडावे लागेल, याचीही भीती त्यांना वाटत होती. त्यामुळे, अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे.

पवारांच्या माघारीमागे राज्यसभेत गमवावी लागणारी एक जागा हा ही विचार असल्याचे सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर १५ दिवसांमध्ये संबंधित सदस्याला राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागतो. ही जागा मोकळी झाल्यास विधानसभेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात त्याची पोटनिवडणूक करून ती जागा संख्याबळाच्या जोरावर हिसकावून घेण्याची भाजपने यापूर्वीच तयारी सुरू केली होती.

राज्यसभेमध्ये भाजपविरोधी खासदारांची संख्या अधिक आहे. हा फरक वेगाने कमी होत असताना, अशाप्रकारे एक जागा स्वत:हून देणे ही भाजपला मदतच होईल, असे मत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पवारांसोबतच्या बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. माढ्यातून पवारांची उमेदवारी मागे घेण्यामागे हे ही एक प्रमुख कारण आहे.

राजकारणात केव्हा काय होईल याचा भरवसा नसतो. तर विरोधकांना हुलकानी देत शह प्रतिशह देण्याचे राजकीय व मुत्सद्दी डावपेचही आखले जातात. त्यामुळे आज घेतलेल्या निर्णयामुळे पक्षांत मोठी खळबळ उडाली आहे. तर विरोधही सावध झाले आहेत. पुढे काय होतेय ते लवकरच कळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!