मेहरुण तलाव परिसरातील लेक रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरात साडेचार लाखाची चोरी

0

जळगाव | प्रतिनिधी :  मेहरुण तलाव परिसरातील लेक रेसिडेन्सी अपार्टमेंट मधील बी-२ फ्लॅट मधील सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरात घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली.

या मध्ये चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाज्याचे लॉक तोडून आत प्रवेश करुन घरातील सुमारे साडेचार लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे. दरम्यान सेवानिवृत्त शिक्षीका गेल्या दोन महिन्यांनंतर घरी परतल्याने चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरसोली रोडवर असलेल्या मेहरुण तलावाजवळ लेक रेसिडेन्सी अपार्टमेट आहे. या अपार्टमेंट मध्ये एकूण सोळा फ्लॅट आहे. यामध्ये संत हरदासराम सिंधी हाययस्कूलमधील सेवानिवृत्त शिक्षिका मधुबाला बाळकृष्ण जोशी (वय ६५) या दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहतात.

मधुबाला जोशी यांचा मुलगा राहुल हा दिल्लीत एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तर मुलगी पुणे येथे वास्तव्यास आहे. दरम्यान जोशी या सेवानिवृत्त झाल्यापासून ते फ्लॅटमध्ये एकट्याच राहत असल्याने त्या दि. ५ मे रोजी पासून दिल्लीला आपल्या मुलाकडे गेल्या होत्या.

सुमारे दोन महिन्यांनंतर मधुबाला जोशी या आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरी परतल्या. यावेळी त्यांना फ्लॅटचे मुख्यदाराचे कुलूप तोडलेले आढळून आले व मुख्य दारावर असलेले जाळीचे दार असून ते अडकवलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यावेळी त्यांनी दार उघडेच असल्याने घरात जावून पाहिले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. दरम्यान त्यांनी तत्काळ शेजारी वास्तव्यास असलेले डॉ. धनजय बेंद्र यांना सांगीतले.

यावेळी डॉ. बेंद्र यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसांना संपर्क साधून घरफोडी झाल्याची माहिती दिली. यावेळी पोलिस निरीक्षक निरीक्षक सुनील कुराडे, उपनिरीक्षक रोहन खंडागळे घटनास्थळी दाखल होवून माहिती घेतली.

ठसे तज्ञांनी घेतले नमुने

भरदुपारी धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एमआयडीसीचे पोलिस निरीक्षकांनी ठसे तज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन गांगुर्डे, पोहेकॉ. राजेंद्र महाजन यांनी पाचारण केले. यावेळी ठसे तज्ञांनी घरातील चोरी झालेल्या ठिकाणावरील ठसे घेवून पंचनामा केला.

सीसीटीव्ही नावालाच

लेक रेसीडेन्सी अपार्टमेंट मध्ये सोळा फ्लॅटची सोसायटी आहे. सोयायटीच्या आत शिरतांना समोरच सावधान आपण सिसीटीव्ही कॅमेर्‍याच्या निरीक्षणात आहात अश्या आशयाचा फलक आहे.

मात्र प्रत्यक्षात सोसायटीमध्ये एकही सिसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सीसीटीव्ही केवळ नावालाच असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.

४ लाख ३० हजाराचा मुद्देमाल लंपास

फ्लॅटमालक मधुबाला जोशी या गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांनी स्वयंपाक घरात कपाट, फ्रिजसह, देवघर, बाथरुम मध्ये सुद्धा चोरटयांनी शोध घेतला.

यामध्ये चोरट्यांनी २ लाख ५० हजार रोख रक्कम तसेच ५०ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या,१० ग्रॅमच्या गळ्यातील कंठीहार,१२ ग्रॅमच्या तीन अंगठी, ५ ग्रॅमचे कानातले व चांदीचे भांडे असा एकूण सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे जोशी यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*