महिलांसाठी सुरक्षित वातावरण निमिर्तीची गरज

0
विधात्याची नवनिर्माणाची कलाकृती तु एक दिवस तरी स्वत:च्या अस्तीत्वाचा साजरा कर तु, उठ चल यशाच्या शिखराची साद ऐक तु, स्त्री म्हणून जन्मलीस, व्यक्ती म्हणून जग तु’ आजचा दिवस म्हणजे 8 मार्च जागतीक महिला दिन. प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच.

छत्रपती शिवाजी महाराजांना घडवून एक स्त्री काय करू शकते याचे दर्शन मानवजातीला देणार्‍या थोर जिजाऊ, स्त्री शक्ती, स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्रीयासाठी शिक्षणाचे प्रगतीचे द्वार उघडणार्‍या सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याला खरच सलाम.
स्त्री जन्मा तुझी ही कहाणी
हृदयी अमृत नयनी पाणी
21 व्या शतकात आधुनिकतेचे वारे सर्वत्र वाहत असतानाही आजही स्त्रीयांचे हुंडाबळी जातात. लैंगीक अत्याचार होतात. त्यांना हिन वागणूक दिली जाते. गर्भाची तपासणी करून स्त्री जन्माला येण्याअगोदरच कोवळा जीव गर्भात मारला जातो. परंतू या जगात तिने प्रवेश केल्यावरही ‘भय इथले संपत नाही’ अशी आज स्थिती आहे. घरातल्या जवळच्या नातेवाईकांपासून गावातल्या टवाळ, गुंडापर्यंत कुणाही तीच्या वाटेवर काचा बनून रक्तबंबाळ करू शकतो. स्त्रीला एक सेफ झोन तयार करणार आहोत की नाही हाच एक प्रश्न आजच्या महिला दिनानिमित्त आहे. तरीही आज भारतीय स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपतावर आहे.

शेतातील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत ते संरक्षणमंत्री पदापर्यंत तीची यशस्वी घौडदौड चालू आहे. एक ना अनेक क्षेत्रात आपली यशस्वी भुमिका बजावत आहे. सलाम या नारी शक्तीला यांच्या कर्तृत्वाचा आलेख चढता आहे. ‘कोमल है, कमजोर नही तु, शक्ती का नाम ही नारी है, जग को जीवन देनेवाली मौत भी तुमसे हारी है’ स्त्रीला समाजाने अबला असे सुंदर नाव दिले पण ती अबला नसून सबला आहे म्हणूनच तुझ्या उत्तुंग भरारीपुढे नभ ही ठेंगणे भासते, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसते.

स्त्री म्हणजे युगाची प्रगती आहे. प्रयत्नांना लाभलेली उन्नती आहे. कलेच्या क्षेत्रात मुर्तींमंत नटराज मुर्ती आणि सर्व यशाची किर्ती आहे. स्त्री म्हणजे काय स्त्री म्हणजे कोमलता, कोमलेतेत प्रचंड सामर्थ्य असते. म्हणूनच खडक झीजतात. तर प्रवाह मात्र रूंदावतो. स्त्री म्हणजे आकाशातली धगधगती सौदामिणी, ओलावून धुंद बरसणारी श्रावणी, उन्हात गारव्याची शीतल छाया ती, थंडीच्या शहार्‍यात उबदार दुलई ती, पण समाज केवळ स्त्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून स्त्रीकडे कधी पाहणार हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

स्त्री ही अगाध शक्तीचे रूप आहे म्हणूनच हिरकणीसारखी आदर्श आई स्वत:च्या बाळासाठी रायगडाचा उभा कडा उतरून खाली आली. ती ममतेचा झरा आहे. झाशीच्या राणीने तर बाळ पाठीवर बांधून लढाई खेळली. सिंधुताई सपकाळ स्वत:वरील अन्याय बाजुला ठेवून हजारोंच्या माता बनल्या. त्यांनी अश्रुंनाही दरडावून सांगितले ‘डोळ्यातील आसवांनो वाहू नका, अंतरीच्या वेदना जगा दावू नका’ स्त्रीने अन्याय सहन केला. ही स्त्रीचीच मोठी चुक आहे. छळ अत्याचार यांच्या ओझ्याखाली स्त्री जीवनातील हास्य हिरावून त्या अबलेची चक्रव्युहात भडकलेल्या अभिमन्यु सारखी व्यवस्था झाली होती.

पण आता काळामानाप्रमाणे मुली शाळा, कॉलेजात शिकू लागल्या आहेत. त्याचे कार्यक्षेत्र विस्तारले आहेत. त्या स्वत:साठी ओळख निर्माण करीत आहेत. आजची स्त्री आता पेटून उठली आहे. तीला तीच्या हक्काची जाणीव झाली आहे. स्त्री ही बंदींनी नाही तर ती वंदनीय आहे.

एका कवीने म्हटले आहे.. अजुन दुर क्षितीज आमुचे, अजुन दुर जायचे, पुन्हा जमवू वादळ वारे, पुन्हा उभारू शिडे’ स्त्रियांनी स्वत: आत्मपरीक्षण करून स्वत:मधील न्यूनतेची भावना कमी करावी. कष्टाने, जिद्दीने आपल्या क्षेत्रात उत्तुंग गरूडझेप घ्यावी. शिक्षणाची कास सोडू नये, स्वत:चे आरोग्य जपावे. छोट्या हक्कांसाठी लढण सोडू नये. येणारी पिढी संस्कारीत घडवावी प्रत्येक आईने मुलीच्या मागे खंबीर उभे रहावे.

हुंडाविरोधात, स्त्री भ्रुण हत्या विरोधात मोठे पाऊल उचलावे. आपण जिजाऊंच्या लेकी आहोत हे ही लक्षात ठेवून येणार्‍या पिढीला आपण आदर्श वाटेल असे आपण संस्कार त्यांच्यामध्ये रूजवले पाहिजे. आतापर्यंत निर्भयाची पुनरावृत्ती होवू द्यायची नाही. तर आता रणरागीणीचे, महिषासूर मर्दीनीचे रूप धारण करायला विसरायचे नाही. समाज नेहमी स्त्रीला शारीरीक कमजोरी बद्दल बोलतो, पण महिलांना खरोखरच बळकट आणि स्थिर हातांची शैक्षणीक देणगी पण दिलेली आहे हे विसरू नका. तुमच्या निर्णयाची जबाबदारी तुम्ही स्वत: घेतली पाहिजे. मग तो निर्णय चुकीचा असेल किंवा बरोबर असेल, पण जबाबदारी घेत नाही तोपर्यंत तुमच्यात सुधारणा होणार नाही.

कुठलीही नवीन कल्पना मनात ठेवू नका. कोण काय म्हणेल, कस होईल वगैरे विचार न करता ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा. अपयश कुणाला चुकल नाहीये. पण त्याची भीती बाळगून बसलात तर मात्र हाती काहीच लागणार नाही. कामाच्या ठिकाणी तुम्ही फक्त प्रोफेशनल असता. मी स्त्री आहे मला सवलत द्या कोणीही म्हणू नये. मुलींनीही तितक्याच आक्रमकपणे, मनापासून आणि तितक्याच मेहनती काम केल पाहिजे. कारण आपल्यामध्ये कुठले गुण आहेत याची आपल्याला जाण हवी.

कारण तु आई आहे तु ताई आई, तु मैत्रीण आहे, तु पत्नी अहे, तु मुलगी आहे. खर तर सर्व प्रथम तु जन्म आहे, तुच सुरवात आहे. सुरवात नसेल तर बाकी सारे व्यर्थ आहे. या महिलादीनी एकच सांगावेसे वाटते आज-काल होणारे मुलीवरील अत्याचाराला आळा बसायला हवा कारण ‘खरा दसरा तेव्हा असेल जेव्हा प्रत्येक बलात्कार करणार्‍या नराधमांना भर चौकात जिवंत जाळले जाईल. म्हणूनच मुलींनो, महिलांनो उठा. शिक्षणासाठी पेटून उभ्या रहा. आपले कर्तृत्व आपल्यालाच सिध्द करायचे आहे. द्रौपदीच्या वस्त्रहरणात भगवंत धावून आले पण या 21 व्या शतकात स्वत:लाच स्वत:चे रक्षण करायचे आहे. शेवटी इतकेच म्हणेन, नारी तु घे अशीच उंच भरारी, फिरून पाहू नकोस माघारी, फिरून पाहू नकोस माघारी…

मोनाली लंगरे जळगाव

LEAVE A REPLY

*