भजी पचणार की त्रासदायक ठरणार ?

0
जळगाव, दि. 10 (प्रतिनिधी)-जळगावचे वैभव असणार्‍या मेहरुण तलावाच्या साक्षीनं जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक माजी मंत्री एकनाथराव खडसे व सुरेशदादा जैन यांनी सुहास्य वदनाने एकमेकांना भजी भरवली.
ही भजी कुणाला पचणार आणि कुणाला त्रासदायक ठरणार याची खमंग चर्चा आता सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी मात्र भजीच्या प्रेमात न पडता तुमची भजी तुम्हालाच लखलाभ म्हणत जणू अलिप्ततेचेच धोरण स्विकारलेले दिसले.
मराठी प्रतिष्ठान तर्फे रविवारी मेहरुण तलावावर भजी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यास आ.खडसे, माजी आ. सुरेशदादा आणि माजी खासदार जैन यांनी हजेरी लावल्याने तो उत्सुकतेचा विषय झाला.

यावेळी खडसेंनी दादांना मिरचीची तर सुरेशदादांनी खडसेंना बटाटा भजी खाऊ घातली. तब्बल सात वर्षांनी जिल्ह्यातील हे दोघे मातब्बर राजकीय वैर बाजूला सारुन एकत्र आले, इतकेच नव्हे तर एकमेकांना भजी भरवून छायाचित्रकारांना पोजही दिल्याने जिल्हाभरात तो एक चर्चेचा विषय झाला.

आ. खडसेंनी आपल्या फार्महाऊसमधील ओली खारिक व बेदाण्याचा वानोळाही दादांना दिला. त्यावर खारिक गोड आहे अशी गोड प्रतिक्रीया दादांनी दिली.

आज सर्वच माध्यमांनी या प्रसंगाची दखल घेत दादा-भाऊंच्या मनोमिलनाची गरज अधोरेखित केली. भजी खाल्ली खरी पण ती कुणाला पचणार आणि कुणाला त्रासदायक ठरणार यावर आज दिवसभर चर्वण सुरु होते.

दादा-भाऊ कार्यक्रमानिमित्त एकत्र आले असले तरी मनाने एकत्रित येतील का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद असू नयेत हे दोन्ही नेत्यांना आता पटलेले दिसते.

हे दोन्ही नेते सत्तेत आहेत. खडसेंच्या मंत्रिमंडळात पुनरागमनाची चर्चा झडते आहे. सुरेशदादाही आता पूर्वपदावर येत सार्वजनिक कार्यक्रमात दिसू लागले आहेत.

या पार्श्वभूमिवर या दोन्ही नेत्यांचे मनापासून एकत्र येणे जिल्ह्यासाठी सुखकर बाब असल्याचे सर्वसामान्यांना वाटते आहे.

या दोघांतील वैरामुळे या दोघांसह जिल्ह्याचीही मोठी हानी झाली आहे. भजीच्या प्रेमात न पडता अलिप्त राहणार्‍या बाबुजींच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असे म्हणत भजीमुळे खरचं मनं जुळणार असतील तर राष्ट्रवादी चौकाचौकात भज्यांचे स्टॉल्स लावेल असा तडकाही दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*