पाऊस हरपला…पिके करपली…!

0
जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-गेल्या वीस दिवसांपासुन जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. भुसावळ, मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात सर्वाधिक बिकट परीस्थीती असुन यंदा उत्पन्नात किमान दहा टक्के घट होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिली. त्यामुळे बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे.

सद्यस्थितीला जिल्ह्यात 78 टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात जळगाव- 103 टक्के, भुसावळ- 76, बोदवड- 85, यावल- 74, रावेर- 42, मुक्ताईनगर- 58, अमळनेर-84, चोपडा- 51, एरंडोल-106, धरणगाव-78, पारोळा- 76, चाळीसगाव -69, जामनेर-95, पाचोरा-91, भडगाव-96 अशी एकुण 78 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.

दुबार पेरणीचे संकट
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने आणि तीन दिवसात चांगला पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यताही कृषी विभागाच्या सुत्रांनी वर्तविली आहे.

तीन दिवसात चांगला पाऊस
हवामान खात्याने तीन दिवसात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे त्यांनी मोड करण्याची घाई करू नये असे आवाहन कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांनी केले.

कृषी अधिकार्‍यांकडुन पाहणी
जिल्ह्यातील पीक परीस्थीतीची कृषी अधिक्षक विवेक सोनवणे व उपसंचालक अनिल भोकरे यांच्या टिमने भुसावळ आणि जळगाव तालुक्यात पाहणी केली. सद्यस्थितीला शेतकर्‍यांनी सोयाबीन, बाजरी आणि मका पिकाची पेरणी करावी अशी सुचना त्यांनी केली आहे.

विम्याचे अर्ज स्विकारण्यास बँकांची हरकत
जिल्ह्यातील एक लाख 25 हजार शेतकर्‍यांच्या विमासाठी रक्कम कपात करण्यात आली असली तरी राष्ट्रीयकृत बँका अद्याप अर्ज स्विकारत नसल्याचे कृषी विभागाने सांगितले. त्यामुळे शेतकर्‍यांना विम्याचे कवच मिळण्यात अडचण येत आहे.

 

LEAVE A REPLY

*