शिवसेनेने जिल्हा बँकेसमोर तासभर बडविले ढोल

0
जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेवून 25 दिवस उलटून देखील शेतकर्‍यांना कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही.
त्यामुळे राज्य सरकारला उघडे पाडण्यासाठी आज शिवसेनेतर्फे जिल्हा बँकेसमोर सुमारे तासभर ढोल बडविण्यात आले. या आंदोलनात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आ. किशोर पाटील यांंनीही सहभाग घेतला.

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. ही घोषणा होऊन 23 दिवस उलटले तरी अद्याप शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले नाही.

त्यामुळे फडणवीस सरकार फसवे असल्याचा आरोप शिवसेनेने केला. दरम्यान सरकारला उघडे पाडण्यासाठी आज शिवसेनेतर्फे जिल्हा बँकेसमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तासभर ढोल बडविले.

आंदोलनात उपाध्यक्षांचाही सहभाग
शिवसेनेच्या या आंदोलनात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असलेले आ. किशोर पाटील हे अग्रस्थानी होते. तसेच आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आ. आर.ओ. पाटील, माजी आ. दिलीप भोळे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक गणेश राणा,ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, प्रकाश बेदमुथा, मानसिंग सोनवणे, गणेश सोनवणे, किशोर भोसले, नरेंद्र सोनवणे, रावसाहेब पाटील, मुन्ना पाटील, महिला आघाडीच्या संघटक महानंदा पाटील, जि.प.सदस्य प्रताप पाटील, इंदीराताई पाटील, शोभा चौधरी, मंगला बारी, सुनिता भालेराव, ज्योती शिवदे, मनिषा पाटील, आशा खैरनार, सरला साळवे, आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

बँकेच्या एमडींना निवेदन
राज्य शासनाने शेतकर्‍यांना तात्पुरत्या स्वरुपात 10 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. परंतु यातील निकष अतिशय क्लिष्ट असल्याने अद्याप 90 टक्के शेतकर्‍यांना तात्पुरत्या स्वरुपातील 10 हजार रुपये मिळालेच नाही.

दिड लाखाचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु अद्याप जिल्हा बँकांनी कुठल्याही याद्या जाहीर केलेल्या नाही.

जिल्हा बँकांनी कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांच्या याद्या त्वरीत जाहीर कराव्यात अशा मागणीचे निवेदन जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना शिवसेनेतर्फे देण्यात आले.

बँकेतर्फे आंदोलकांना सरबत


जिल्हा बँकेवर ढोल बडविण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या आंदोलकांना बँक प्रशासनातर्फे सरबत आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

 

LEAVE A REPLY

*