….तर गाळेप्रकरणी न्यायालय निर्णय घेणार !

0
जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांबाबत दाखल असलेल्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात कामकाज झाले.
दरम्यान, भाडेवसुलीसाठी करण्यात आलेल्या 40 क्रमांकाचा ठराव शासनाने निर्णयास्तव राखून ठेवला असल्याचे सरकारी वकीलांनी सांगितले.
यावर न्या.धर्माधिकारी व न्या.मंगेश पाटील यांनी शासनाने निर्णय न घेतल्यास सर्व मुद्दे नमूद करुन आदेश पारित केला जाईल, असे सांगितले. पुढील सुनावणी दि.17 रोजी होणार आहे.

मनपा मालकीच्या 29 व्यापारी संकुलांपैकी 18व्यापारी संकुलातील 2175 गाळ्यांची मुदत मार्च 2012 ला संपुष्टात आली आहे.

गाळे पुन्हा कराराने देण्याबाबत महासभेने ठराव केला आहे. तसेच भाडे वसुलीसाठी रेडीरेकनरनुसार पाचपट दंड आकारणीचा ठराव क्र. 40 महासभेत मंजूर केला होता.

परंतु काही गाळेधारकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिल्यामुळे 40 क्रमांकाच्या ठरावाला स्थगिती देवून सुनावणी करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्याकडे सुनावणी झाली. परंतु निर्णय राखुन ठेवण्यात आला आहे. निर्णय राखून ठेवल्याच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्या.धर्माधिकारी, न्या.मंगेश पाटील यांच्या द्विपीठासमोर कामकाज झाले.

करार संपल्यानंतर गाळे ताब्यात का घेतले नाही? अशी विचारणा केली असता. मनपाच्या वकील अ‍ॅड.पी.आर.पाटील यांनी युक्तीवाद करतांना सांगितले की, करार संपल्यानंतर गाळे ताब्यात घेतले असते.

तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. असे सांगितले. त्यानंतर सरकारी वकील अ‍ॅड.गिरासे यांनी भाडे वसुलीसाठी करण्यात आलेल्या 40 क्रमांकाच्या ठरावावर नगरविकास राज्यमंत्र्यांकडे सुनावणी झाली असून येत्या दोन-तीन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे.

त्यामुळे मुदत द्यावी, असे युक्तीवादात सांगितले. दरम्यान शासनाने निर्णय न घेतल्यास सर्व मुद्दे नमूद करुन गाळ्यांबाबत आदेश पारित केला जाईल.

असे न्या.धर्माधिकारी व न्या.पाटील यांच्या द्विपीठाने सांगितले. याप्रकरणी पुढील सुनावणी दि.17 रोजी होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*