साफसफाईच्या तक्रारी थांबविण्यासाठी नगरसेविकेसह उपायुक्त, आरोग्य अधिकार्‍यांकडून तडजोडीचा प्रयत्न : नगरसेविका अश्‍विनी देशमुख, विनोद देशमुख यांचा आरोप

0
जळगाव |  प्रतिनिधी :  मनपा प्रशासनाने प्रभाग क्र.३६ महाबळमध्ये सहजीवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला साफसफाईचा ठेका दिला आहे. साफसफाईचा ठेका देवूनही स्वच्छता होत नसल्यामुळे प्रशासनाकडे जवळपास ३५०० तक्रारी केल्यात. मात्र यावर प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही.
उलट तक्रारी थांबविण्यासाठी नगरसेविका ज्योती चव्हाण आणि त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण तसेच उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांच्याकडून तडजोडीचा प्रयत्न केला असल्याचा आरोप नगरसेविका अश्‍विनी देशमुख आणि विनोद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, याबाबतचे त्यांनी व्हिडीओ क्लिप्स देखील यावेळी दाखविल्या.

प्रभाग क्र.३६ मधील सहजीवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे ठेकेदारांनी पैशाची मागणी केली, असा आरोप केला होता. तिला मात्र हा आरोप बालिशपणाचा आणि बिनबुडाचा असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

साफसफाईच्या ठेकेबाबत आमच्याकडे सर्व पुरावे असून सभागृहात प्रोजेक्टरच्या मागणीसाठी आयुक्त आणि महापौरांकडे पत्राद्वारे मागणी केली. तसेच एटीएस व कोणत्याही शासकीय यंत्रणेस व्हिडीओ क्लिप दाखविण्याची तयारी दर्शविली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

सभागृहात प्रोजेक्टर लावण्याची मागणी करुनही आयुक्त आणि महापौरांनी परवानगी दिली नाही.

साफसफाईच्या ३५०० तक्रारी

प्रभाग क्र.३६ मध्ये साफसफाई होत नसल्याने ३५०० ऑनलाईन तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाने जवळपास १५०० तक्रारी गायब केले असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

तक्रारी करुनही ठेकेदारांवर दंड लावलेला नाही. अस्वच्छता दिसल्यास दर महिनाला जवळपास ६० हजार रुपयाची दंडाची रक्कम होते. मात्र आरोग्य अधिकार्‍यांनी केवळ ३ हजार रुपये दंड केला आहे.

नगरसेविकेसह आरोग्य अधिकार्‍यांच्या घरी बोलवून तडजोडीचा प्रयत्न

साफसफाई बाबतच्या तक्रारी थांबविण्यासाठी आणि तडजोड करण्यासाठी नगरसेविका ज्योती चव्हाण व आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांच्या घरी बोलवून तडजोडीचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी ठेकेदार व नगरसेविका ज्योती चव्हाण यांचे पती बाळासाहेब चव्हाण हे पैशाची ऑफर देत होते. १० हजार रुपये घ्या व तक्रारी बंद करा, असे सांगण्यात आले. त्यानंतर आरोग्य अधिकारी विकास पाटील यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्याशी फोनवर बोलणे करुन दिले.

उपायुक्त कहार यांनी ‘तुम्ही जरी पुराव्याने तक्रारी केल्या असल्या तरी त्या तक्रारी आम्ही नाकारु शकतो. तुम्ही कशाला विरोधात जात आहे. जसे चालले आहे तसे चालू द्या, बाकी आरोग्य अधिकारी तुम्हाला सांगतील.’ असे म्हटल्याचेही विनोद देशमुख यांनी सांगितले.

अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

मनपा आयुक्त, उपायुक्त आणि आरोग्य अधिकार्‍यांनी आर्थिक व्यवहार करुन साफसफाईचा ठेका सुरु ठेवला आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका अश्‍विनी देशमुख यांनी केली. तसेच आयुक्तांचे निवृत्तीवेतन थांबवावे, अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली.

आरोग्य अधिकारी म्हणातात, रक्कम वाढवा, प्रॉफिट वाढवून देतो

तक्रारी थांबविण्यासाठी १० हजार रुपयाचे पाकीट देतो, असे ठेकेदाराच्या प्रतिनिधींनी सांगितल्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी १० हजार रुपये कमी होतात. तुम्ही थोडे पैसे वाढवा, दंड कमी करुन मी तुमचा प्रॉफिट वाढवून देतो, असे सांगितले.

तर बाळासाहेब चव्हाण यांनी १५०० रुपये महिना मी स्वत: तुमच्या घरी आणून देणार, असे म्हणाल्याचे विनोद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नगरसेविका ज्योती चव्हाण यांनीही निवडणूकीला १८ महिना राहिले आहेत.

निवडणूकीत आपल्यालाही पैसे लागणार आहेत, पैसे कमवा असे म्हटल्याची व्हिडीओ क्लिप विनोद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आर्थिक व्यवहारामुळे ठेका सुरुच
प्रभाग क्र.३६ मधील साफसफाईचा ठेका बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र आयुक्त, उपायुक्त, आरोग्य अधिकारी व ठेकेदार यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याने रद्द केलेला ठेका पुन्हा सुरु करण्यात आला असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मनपा प्रशासनाने प्रभाग ३६ मध्ये सहजीवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला साफसफाईचा ठेका दिला आहे. स्वच्छता होत नसल्याबाबत तक्रारी करुनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*