जळगावात रंगला राजकीय भजी महोत्सव

0

जळगाव |  प्रतिनिधी :    राजकारणातील दिग्गज माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, माजी आ. सुरेशदादा जैन आणि माजी खा. ईश्‍वरबाबुजी जैन हे तिनही आज मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजीत भजी महोत्सवाच्या निमीत्ताने एकत्र आले. या महोत्सवात तीनही नेत्यांनी एकमेकांना चमचमीत भजे खाऊ घालून आस्वाद घेतला.

मराठी प्रतिष्ठानतर्फे आज वृक्ष लागवड आणि भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मोहाडी रस्त्याच्या दुभाजकांवर माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

मराठी प्रतिष्ठानच्यावतीने या परीसरात २ हजार वृक्षरोपण केले जाणार आहे. त्यानंतर मेहरूण तलाव येथे भजी महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. या महोत्सवासाठी राजकारणातील दिग्गज माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, माजी आ. सुरेशदादा जैन आणि माजी खा. ईश्‍वरबाबुजी जैन यांनी हजेरी लावली.

यावेळी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा, मराठी प्रतिष्ठानचे प्रमोद बर्‍हाटे, जमील देशपांडे, विजय वाणी, दिलबागसिंग छाबडा, विशेष सरकारी वकील केतन ढाके, अनिल कांकरीया, नगरसेवक सुनिल माळी, जितेंद्र मुंदडा, अशोक लाडवंजारी, आदी उपस्थित होते.

नाथाभाऊंकडून सुरेशदादांना मिरचीचा भजा

भजी महोत्सवात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मिरचीच्या भज्यांची चव चाखली. यावेळी माजी खा. ईश्‍वरबाबुजी यांनी ‘जो खुद मिरची है वो मिरची के भजे खा रहे है अशी कोपरखळी आ. खडसे यांना लगावताच हास्याचे फवारे उडाले. त्यानंतर आ. खडसे व माजी आ. सुरेशदादा यांनी एकमेकांना भजे खाऊ घातले.

तसेच आ. खडसे यांनी सुरेशदादांना मिरचीच्या भज्याची चव चाखण्यास दिली. जळगावात मेहरूण तलावावर रंगलेल्या या दुर्मिळ राजकीय भजी महोत्सवामुळे तीनही नेते पुन्हा एकत्र येतील का ? असे अंदाज उपस्थितांमध्ये बांधले जातांना दिसत होते.

ओले खजुर अन् जांभळांचाही घेतला आस्वाद

कार्यक्रमस्थळी आ. एकनाथराव खडसे यांनी आणलेले ओले खजूर आणि छोट्या जांभळांचीही चव सुरेशदादा आणि माजी खा. ईश्‍वरबाबुजी यांना चाखण्यास दिली. दादा आणि बाबुजींनी आवडीने ओले खजूर आणि जांभळाचा आस्वाद घेतला.

खडसेंनी सांगितली सहदेव-भाडळीची भविष्यवाणी

सातशे वर्षापुर्वी मार्तंड जोशी यांच्या पोटी जन्माला आलेल्या सहदेव-भाडळीच्या भविष्यवाणीची कथा आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितली. त्यात आषाढात मंगळवारी जर आषाढी एकादशी आली तर पाऊस एक महिना लांबतो असे पुर्वीचे जाणकार सांगायचे.

सात वर्षानंतर दादा-भाऊ एकत्र

तब्बल सात वर्षानंतर माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे आणि माजी आ. सुरेशदादा जैन हे भजी महोत्सवाच्या निमीत्ताने एकत्र आले. सात वर्षापुर्वी मेहरूण तलावाजवळच आयोजीत जागतिक छायाचित्रण दिनानिमीत्त या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे फोटो क्लिक केल्याची आठवण यावेळी निघाली.

LEAVE A REPLY

*