शिवसेनेचे उद्या ‘ढोल बजाओ’ आंदोलन

0
जळगाव । दि.8 । प्रतिनिधी-राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेवून 20 दिवस उलटून देखील शेतकर्‍यांना कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही.
राज्य सरकारला उघडे पाडण्यासाठी शिवसेनेतर्फे उद्या दि.10 रोजी जिल्हा बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येवून सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या पदधिकार्‍यांना पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे दि.12 रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहे. तसेच उद्या दि.10 रोजी जिल्हा बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याने जिल्हा शिवसेनेची पद्मालय विश्रामगृह येथे जिल्हा बैठक घेण्यात आली.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दौर्‍यासंबंधीचे नियोजन व आंदोलनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
राज्य शासनाने शेतकर्‍यांना तात्पुरत्या स्वरुपात 10 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते.

परंतु यातील निकष अतिशय क्लिष्ट असल्याने अद्याप 90 टक्के शेतकर्‍यांना तात्पुरत्या स्वरुपातील 10 हजार रुपये मिळालेच नाही.

दिड लाखाचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु अद्याप जिल्हा बँकांनी कुठल्याही याद्या जाहीर केलेल्या नाही.

राज्यसरकार जिल्हा बँकेच्या खांदयावर बंदुक ठेवून गोळया मारत असून जिल्हा बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेतून शेतकर्‍यांना पैसे मिळत नसल्याचा आरोप शिवसेनच्या पदाधिकार्‍यांनी केला.

जिल्हा बँकांनी कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांच्या याद्या त्वरीत जाहीर कराव्यात अशी मागणीही पदाधिकार्‍यांनी यावेळी केली.

पत्रकार परिषदेवेळी आ.किशोर पाटील, माजी आ. चिमणराव पाटील, माजी आ. आर.ओ.पाटील, माजी आ. दिलीप भोळे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, जि.प सदस्य प्रताप पाटील, हभप जळकेकर महाराज आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उध्दव ठाकरे बुधवारी जिल्हा दौर्‍यावर
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दि.12 रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. सकाळी 11.45 वाजता पाळधी येथे शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता धरणगाव आणि 1.30 वाजता पारोळा येथे सभा होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*