चीनी वस्तुंच्या बहिष्कारासाठी पुन्हा ‘चले जाव’चा नारा

0
जळगाव । दि.8 । प्रतिनिधी-चीन वस्तुच्या बहिष्कारासाठी ‘चले जाव’चा नारा देवून, मेक इन इंडिया योजनेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली असल्याची माहिती विवेकानंद बहुउद्देशिय मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. चीनी मालाविरोधात हे अनोखे आंदोलन जळगाव शहरातून सुरु करण्यात आले असल्याची त्यांनी सांगितले.
चिनकडून भारतीय सार्वभौमत्वाला धोका निर्माण झालेला आहे. एकीकडे पाकिस्तानशी सैनिकी युती करून चिन भारताला संपवू पाहात आहे आणि दुसरीकडे जागतिक खुल्या आर्थिक धोरणाचा गैरफायदा घेऊन आपल्या स्वस्त व तकलादू वस्तू भारतीय बाजारात विकून इथली अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहात आहे.

त्यामुळे चीनी मालावर बहिष्कार मोहिम सुरू करण्यात आली असून जनजागृतीसाठी 1 लाख प्रसिद्धपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लंडनहून भारतात परतताना इंग्रज सरकार राजद्रोहावरून आपल्याला अटक करणार हे लक्षात येताच 8 जुलै रोजी (1910) समुद्रात उडी घेतली होती व फ्रांसचा किनारा गाठला होता. याच दिवसाचे औचित्य साधून चीनी वस्तुंच्या बहिष्कारासाठी मोहीम सुरु केली आहे. गणेशोत्सवासह प्रत्येक सणाला फलकाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

मेक इन इंडियासाठी पुढाकार
सन 2001 पासून ते आजअखेर भारतातील चिनी आयात 40 टक्क्यांनी वाढलेली आहे, भारतात होणार्‍या एकुण आयातीत चिनचा वाटा जवळपास 15 टक्के आहे, दोन्ही देशांतील व्यापार आज 5 लाख कोटींवर गेलेला आहे. 5 लाख कोटींत भारताची निर्यात केवळ 80 हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. म्हणजेच चार लाख कोटींपर्यंत व्यापारी तुटीचा फटका देशाला बसलेला आहे. त्यामुळे चीनी बनावटीच्या वस्तुंना नकार देवून ‘मेक इन इंडिया’ योजनेतील वस्तु खरेदीसाठी समाजात जनजागृती करण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*