चोसाकातील कायम कर्मचार्‍यांचा संप सुरु : चोसाकाचे सर्व कार्यालये दुसर्‍या दिवशीही बंद 

0

चहार्डी, ता.चोपडा, |  वार्ताहर :  येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील इंटक प्रणित राष्ट्रीय साखर कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगारांनी  ३३ महिन्यांच्या थकीत पगारासह विविध मागण्यांसाठी कारखान्यातील चेअरमन, कार्यकारी संचालक, प्रशासनासह सर्व कार्यालयांना कुलूप ठोकून कामबंद आंदोलन पुकारले असून, शुक्रवारी दुसर्‍या दिवशी देखील संप सुरूच होता.

दरम्यान कार्यकारी संचालक दोन दिवसांपासून कोर्ट कामासाठी बाहेरगावी असल्याने आज कामगारांशी मागण्यांबाबत चर्चा होऊ शकली नाही. सोमवारी चर्चेतून मार्ग काढू, असे चोसाकाचे प्रभारी चेअरमन सुरेश पाटील यांनी सांगितले.
कारखान्यातील हंगामी कर्मचार्‍यांनी देखील कामगारांच्या कामबंद आंदोलनाला पाठींबा दर्शविल्याचे संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बर्‍हाटे यांनी सांगितले.

दरम्यान कारखान्याचे प्रभारी चेअरमन सुरेश पाटील संचालकांसह कामगारांशी चर्चा करणार होते. मात्र कार्यकारी संचालक चव्हाण कोर्ट कामासाठी दोन दिवसां पासून बाहेरगावी असलेने दि. ७ रोजी कामगारांशी चर्चा होऊ शकली नाही. परंतु येत्या सोमवारी संचालक मंडळ व कार्यकारी संचालकांसह कामगारांशी चर्चा करू आणि मार्ग काढू असे चोसाकाचे प्रभारी चेअरमन सुरेश पाटील यांनी सांगितले.

चोसाकाचा वीज पुरवठा बंद

आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या चोपडा साखर कारखान्याचा दि.६ जुलै रोजी दुपारी तीन वाजेपासून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.

यासंदर्भात चोपडा येथील महावितरण कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता चौधरी यांचेशी संपर्क साधला असता, चोसाकाकडे एक लाख ५८ हजार रुपये मागील थकबाकी व जून महिन्याचे चालू वीज बिल अशी दोन लाखाच्यावर थकबाकी असल्याने कारखान्याचा वीज पुरवठा बंद करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

दोन दिवसापासून कारखान्याचा वीज पुरवठा बंद असल्याने कारखाना परिसर व कर्मचार्‍यांची वसाहत अंधारात आहे. त्यामुळे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय व विद्यार्थी यांचे हाल होत आहेत.

कर्मचार्‍यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन व वीज पुरवठा खंडीत होणे, एकाच दिवशी दोन्ही घटना होणे म्हणजे हा योगायोग म्हणावा लागेल. परंतु आधीच अनंत अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यात दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागेल.

येता गळीत हंगाम सुरू करणेसाठी भांडवल उपलब्ध करणे, थकीत पगारासाठी सुरू असलेले कामगारांचे आंदोलन,थकीत वीजबिल भरून वीज पुरवठा सुरळीत करणेसह आदी समस्या सोडविण्यासाठी चोसाकातील सर्वपक्षीय नेते व संचालक मंडळाची कसोटी लागणार आहे.

LEAVE A REPLY

*