वृक्षतोडीने पक्ष्यांची प्रजाती नष्ट होण्याची शक्यता : पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ

0

जळगाव |  प्रतिनिधी :  राज्यात एकीकडे ४ कोटी वृक्षलागवड करण्याच्या मोहीमेला शुभारंभ झाला. तर दुसरीकडे मोठमोठ्या झाडांची कत्तल होवू लागली आहे. त्यामुळे अनेक पक्ष्यांची प्रजाती नष्ट होण्याची शक्यता असल्याचे पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले.

सावखेडा रोड, शिरसोली रोड, मेहरूण, ह्नुमान खोरे, निमखेडी रोड, कानळदा रोड, ममुराबाद रोड परिसरात जून महिन्यात एकेका झाडावर वीस वीस पंचवीस पंचवीस घरटी सुगरण पक्षी बांधतांना दिसत असे. पण यावर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्ष तोडी मुळे सुगरणीच्या पक्ष्यांची अगदी तुरळक घरटी बांधलेली दिसली.

त्यामुळे यावर्षी सुगरणीची वीण संकटात आल्याची खंत पक्षिमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी व्यक्त केली. पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष जसे महत्वाचे तसेच वन्य प्राणी, विविध पक्ष्यांच्या अधिवासच्या दृष्टीने महत्वाचे असतात आणि जर वृक्षांची कत्तल अशीच होत राहिली तर येत्या १० वर्षात पक्षी दिसेनासे होतील इतकी विदारक स्थिती आहे.

वन कायद्याची अंमलबजावणी हवी!

पर्यावरणवादी, पक्षीमित्र, वृक्षमित्र यांच्या चळवळीच्या दबावाने कोटी कोटी रुपये खर्चून राज्य शासन कोटी कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली.तर दुसरीकडे वृक्षतोड होत असतांना प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

नव्याने लावण्यात येत असलेल्या ४ कोटी वृक्षांचे संवर्धन व जतन कसे करायचे आणि मोठ्या जुन्या वृक्षांचे वृक्ष तोडीपासून रक्षण कसे करायचे यावर राज्य सरकारकडे काही योजना दिसत नाही.आणि योजना असली तरी योजना व कायदे कागदावरच आहेत.

त्यामुळे राज्य शासनाने आपली वृक्ष लागवड मोहीम निव्वळ मिरवण्यासाठी, शो साठी होऊ नये याची काळजी घ्यावी आणि वन कायद्याची अत्यंत कडक अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा गाडगीड यांनी व्यक्त केली.

खर तर उजाड डोंगर टेकड्यांवर रोपे लावावी आणि जगवावी.म्हणजे खर्‍या अर्थाने जैवविविधता वारसास्थळ तयार होईल अन्यथा नेहमीचे येतो पावसाळा तसे पर्यावरण बचाव आणि वृक्ष लागवडच्या अनेक मोहिमा इव्हेंट बनून येतील आणि प्रश्न तसेच राहतील असेही पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*