शोध दुसर्‍या दुनियेचा !

0

पृथ्वीसारखाच अन्य ग्रह इतर सूर्यमालांमध्ये आहे का, हे कुतूहल आपल्याला पूर्वीपासूनच आहे. १९६० पासून रेडिओ तरंग अवकाशात सोडून त्यास प्रतिसाद मिळतो का, हे पाहिले जात आहे. आता हा शोध निर्णायक टप्प्यात आला असून पृथ्वीशी मिळताजुळता ‘केपलर ४५२ बी’ नावाचा ग्रह शोधून काढण्यात यश आले आहे.

आपल्या जगासारखे दुसरे जग असेल का? त्या जगात राहणारी माणसे कशी असतील? आपल्यासारखीच ती दिसत असतील का? आपल्यापेक्षा पुढारलेली असतील की मागासलेली? हे प्रश्‍न मानवाला पूर्वीपासून पडत आले आहेत.

पृथ्वीपासून दूर परग्रहावर आपल्यासारखेच कुणीतरी राहत असावे, आपल्याला त्यांच्याबद्दल वाटते तसेच कुतूहल आपल्याबद्दल त्यांना वाटत असावे, त्यासाठी ते पृथ्वीवरही येऊन जात असावेत अशा कल्पना पुराणकाळापासून उडत्या तबकड्यांच्या काळापर्यंत सातत्याने रंगवल्या गेल्या आहेत.

परग्रहावरील माणसे म्हणजेच एलियन्स, त्यांची याने म्हणजेच उडत्या तबकड्या (युएङ्गओ) पाहिल्याचे दावे अनेकांनी केले आहेत. परंतु पृथ्वीपासून दूर जीवसृष्टी असल्याचे अधिकृत पुरावे मिळवण्यात आतापर्यंत यश आलेले नाही.

शास्त्रज्ञांमध्येही या विषयावरून मतमतांतरे आणि संशोधने सातत्याने सुरू आहेत. या संशोधनाचा आवाका वाढला आणि त्यासाठी वापरण्यात येणारी साधनसामुग्रीही अधिक प्रगत होत गेली. आता शास्त्रज्ञ अशा मतापर्यंत येऊन पोहोचले आहेत की, पृथ्वीसारखे कमीत कमी दहा ग्रह या ब्रह्मांडात असावेत आणि त्यावर सजीवसृष्टी असावी.

गेल्यावर्षी नासाच्या केपलर या अंतरिक्ष दुर्बिणीतून आपल्या सौरमंडलाच्या बाहेर एक ग्रह शास्त्रज्ञांनी पाहिला. तो हुबेहूब पृथ्वीसारखा असल्याचे त्यांनी नोंदवले. हा ग्रह त्याच्या सूर्याभोवती (तार्‍याभोवती) पृथ्वीप्रमाणेच प्रदक्षिणा घालत असून जीवसृष्टीची निर्मिती होऊ शकण्यासारखे वातावरण या ग्रहावर असावे, असे शास्त्रज्ञांना वाटते.

केपलर दुर्बिणीने आपल्या सौरमंडलाच्या बाहेर एकंदर २१९ नवे ग्रह शोधून काढले आहेत. या सर्व ग्रहांच्या सर्वेक्षणाचा अहवाल ‘केपलर मिशन’ने जारी केला आहे. या ग्रहांपैकी १० पृथ्वीएवढ्याच आकाराचे आहेत. पृथ्वी जेवढ्या अंतरावरून सूर्याची परिक्रमा करते तेवढ्याच अंतरावरून ते आपापल्या सूर्याची परिक्रमा करतात.

त्यामुळे या ग्रहांवर पाणी आणि जीवसृष्टी निर्माण होण्यासारखी परिस्थिती असू शकते, असा कयास आहे. पृथ्वी जेवढ्या अंतरावरून सूर्याची प्रदक्षिणा करते तेवढ्या अंतरावरून आपापल्या सूर्याभोवती ङ्गिरणार्‍या ग्रहांवर रहिवासास अनुकूल स्थिती असू शकते.

या अंतराला ‘हॅबिटॅटल झोन’ संबोधण्यात आले आहे. असे नवीन १० ग्रह दिसून आल्यानंतर ‘हॅबिटॅटल झोन’मध्ये येणार्‍या ग्रहांची एकूण संख्या पन्नासच्या आसपास पोहोचली आहे.

ज्यावेळी केपलर दुर्बिणीतून एका तार्‍याच्या तेजामध्ये थेंबांसारखे घटक (मिनस्क्यूल ड्रॉप्स) दिसले तेव्हा या ग्रहांचा शोध लागला. जेव्हा एखादा ग्रह तार्‍याला ओलांडून जातो तेव्हा अशा प्रकारचे थेंब दिसून येतात. या घटनेला ‘ट्रान्झिट’ असे म्हटले जाते.

ग्रहांची ही नवी यादी म्हणजे संभाव्य ग्रहांचे केलेले आतापर्यंतचे सर्वात परिपूर्ण आणि विस्तृत सर्वेक्षण आहे. केपलर यान २००९ मध्ये जेव्हा सोडण्यात आले तेव्हा आपल्या आकाशगंगेत जवळच्या क्षेत्रात असू शकणार्‍या ‘एक्सो प्लॅनेट’चा शोध घेणे हेच त्याचे उद्दिष्ट होते.

गेल्याच वर्षी आपल्या सूर्यमालेबाहेरील एक ग्रह केपलर दुर्बिणीने शोधून काढला होता. नासाने या ग्रहाला ‘केपलर ४५२ बी’ असे नाव दिले आहे. जी-२ तार्‍याभोवती हा ग्रह प्रदक्षिणा घालतो आहे. जी-२ तारा म्हणजे जणू सूर्याचा चुलत भाऊच! अर्थात त्याचे वय सूर्यापेक्षा दीड अब्ज वर्षे अधिक आहे.

केपलर ४५२ हा ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने साठ टक्के मोठा आहे. नासाने आतापर्यंत रहिवासास अनुकूल अशा बारा ग्रहांचा शोध लावला आहे आणि दुसरी दुनिया शोधण्याच्या मार्गातील हा मैलाचा दगड आहे. या उत्साहवर्धक संशोधनामुळे ‘अर्थ-२’चा म्हणजेच दुसर्‍या पृथ्वीचा शोध घेण्याच्या कामात मोठी प्रगती झाली आहे.

केपलर ४५२ ग्रह पृथ्वीपेक्षा मोठा असला तरी त्याची परिक्रमा ३८५ दिवसांची म्हणजेच पृथ्वीच्या परिक्रमेपेक्षा अवघी ५ टक्के जास्त आहे.

आपली पृथ्वी सूर्यापासून जेवढ्या अंतरावर आहे त्याहून ५ टक्के अधिक अंतरावर हा ग्रह आपल्या तार्‍यापासून आहे. केपलर ४५२ ग्रह सहा अब्ज वर्षे वयाचा असून आपल्या सूर्याच्या वयापेक्षा त्याचे वय दीड अब्ज वर्षे अधिक आहे. या ग्रहाच्या तार्‍याचे तापमान सूर्यापेक्षा वीस टक्के अधिक असू शकते.

या तार्‍याचा व्यासही सूर्यापेक्षा दहा टक्के अधिक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तार्‍यापासून निवासयोग्य क्षेत्रात केपलर ४५२ ग्रहाने सहा अब्ज वर्षे म्हणजेच आपल्या पृथ्वीपेक्षा अधिक वर्षे पाहिली आहेत. त्यामुळेच तेथे जीवनाचा विकास होण्याजोगी सर्व परिस्थिती हजर आहे, असे शास्त्रज्ञांना वाटते. या ग्रहावरील परिस्थितीचे आकलन करण्याचे काम आणखी काही वर्षे चालेल.

अर्थात हा पृथ्वीसारखा दुसरा ग्रह पृथ्वीपासून एवढा दूर आहे की मानवासह तेथे यान पाठवल्यास तेथे पोहोचायला २५ कोटी ८ वर्षे लागतील. तेही यानाची गती ताशी ६० हजार किलोमीटर असेल तर! याच गतीने नासाने सोडलेले एक यान सध्या प्लुटो ग्रहावर पोहोचले आहे. म्हणजेच मानवाला दुसर्‍या दुनियेत पदार्पण करण्याचे स्वप्न आणखी काही वर्षे पूर्ण करता येणार नाही. त्यासाठी खूपच मेहनत घ्यायला हवी.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिङ्गन हॉकिंग सातत्याने सांगत आले आहेत की, मानवी संस्कृती जपण्यासाठी आपल्याला परग्रहावरील सृष्टीचा शोध घ्यावा लागेल. यासाठी त्यांनी रशियन अब्जाधीश युरी मिल्नर यांच्या मदतीने १० कोटी अमेरिकी डॉलर खर्चाचे एक दहा वर्षांचे अभियान सुरू केले आहे. ‘ब्रेक थ्रू मिशन’ नावाने ते ओळखले जाते.

या अभियानाच्या माध्यमातून पृथ्वीपासून दूर अन्य आकाशगंगांमध्ये असलेल्या तार्‍यांकडून येणारे सिग्नल्स ऐकले जाणार आहेत. यापूर्वीच्या अभियानांच्या तुलनेत दहापट अधिक अवकाश काबीज करण्याचा या मिशनचा हेतू आहे. पूर्वीपेक्षा पाचपट अधिक रेडिओ स्पेक्ट्रम स्कॅन केला जाणार आहे. हे काम पूर्वीच्या अभियानांच्या तुलनेत शंभर पट अधिक वेगाने करण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जाणार असून त्याद्वारे एक संदेश तयार केला जाणार आहे. पृथ्वीवरील संदेश अवकाशात सोडण्यात येतील आणि त्यांना प्रतिसाद मिळतो का, हे पाहिले जाईल. हे रेडिओ ऍक्टिव्ह तरंग असतील. यासाठी जगातील सर्वात प्रभावी अशा दोन रेडिओ टेलिस्कोपची (ग्रीन बँक टेलिस्कोप आणि पार्क्स टेलिस्कोप) मदत घेतली जाणार आहे.

तिसरा टेलिस्कोप दुसर्‍या जगातील संकेतांचा शोध घेत राहील. पूर्वीच्या मोहिमांपेक्षा ही मोहीम पन्नास पट अधिक संवेदनक्षम असेल. सर्च ङ्गॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इन्टेलिजन्स या उपक्रमांतर्गत १९६० पासूनच शास्त्रज्ञ यासाठी एकत्र प्रयत्न करीत आहेत.

ओज्मा प्रकल्पाद्वारे या मोहिमेची सुरुवात झाली होती. त्याकाळी रेडिओ टेेलिस्कोपच्या माध्यमातून लहरी पृथ्वीबाहेर अवकाशात सोडण्यात येत असत. आता या कार्यक्रमाची क्षमता आणि वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पृथ्वीशी मिळतेजुळते वातावरण असणार्‍या ग्रहांचा शोध घेण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.

या ग्रहांवर पाऊल ठेवणे आपल्याला एवढ्यात शक्य होईल असे वाटत नाही. मात्र दुसर्‍या जगाचा शोध जारी आहे, जारीच राहील!

– श्रीनिवास औंधकर, ज्येष्ठ खगोलशास्रज्ञ

LEAVE A REPLY

*