Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

येत्या तीन महिन्यात मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा

Share
 मुंबई : येत्या तीन महिन्यांत मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिल्याने रेल्वेने अतिदक्षेचा इशारा जारी केला आहे. सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा, संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्थानकांवर विशेष करून लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम हाती घेण्याच्या सूचना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बुधवारी दिल्या. 

पुलवामा दहशतवादी हल्ला आणि कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेस शौचालयातील दुर्घटना या दोन्ही हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष यादव यांनी रेल्वे पोलिस महासंचालक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या महासंचालक यांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने मुंबई रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा अधिक कडक करण्याच्या सूचना केल्या आहेत.

गुप्तचर संघटनेच्या अहवालानुसार, येत्या तीन महिन्यांत मुंबई रेल्वे स्थानकांवर हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे तीन महिन्यांसाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गर्दीच्या स्थानकांत गर्दी विभाजनासाठी सुरक्षा यंत्रणांची मदत घेण्याचा आदेशही रेल्वे सुरक्षा यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती आरपीएफमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

अतिदक्षतेबाबत रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता, रेल्वे मंडळाकडून सूचना आल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे स्थानकावर अचानक तपासणी, सीसीटीव्ही चित्रणावर नजर, स्थानकावर मॉकड्रिल करण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेषत: दिल्लीकडून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमध्ये बॉम्बशोधक पथकाद्वारे आणि श्वान पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश आहेत.

प्रवाशांनाही आवाहन

दैनंदिन कामकाजात मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांची बॅग स्कॅनरद्वारे बॅग तपासणी, विशिष्ट वेळेनंतर रेल्वे स्थानकाची श्वान पथकाकडून पाहणी होत आहे. बेवारस वस्तू अथवा संशयित बॅग दिसल्यास त्याची माहिती तातडीने आरपीएफ अथवा जीआरपी कर्मचाऱ्यांना द्यावी, प्रवाशांनी अफवा पसरवू नयेत तसेच पोलिसांच्या तपासणीला सहकार्य करणे आवश्यक असल्याची माहिती रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!