Blog : तेणे होय सोयरा पांडुरंग॥

0

पंढरीची वारी म्हणजे चिंतनाची आणि मननाची पर्वणी. ती निष्काम आहे. वारीला जाणारा भक्त काहीही मागत नाही कारण न मागताच त्याला सगळे काही मिळत असते.

विठ्ठल ओळखणारा आहे. त्याला कळते. आषाढी एकादशीला विठ्ठलाचा आशीर्वाद घेताना तुझ्या चरणांनी उभे राहू असे म्हणतात. सरतेशेवटी माणसाचे व्यक्तीत्व स्वच्छ पायावरच तर उभे असते. तो पाया विठ्ठलभक्ती आहे.

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी याचा अर्थ देवांच्या चिंतनाचा काळ. देवांनाही पुढील काळातील चिंतन आवश्यक असते. एकादशी या शब्दाचा अर्थ पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये अधिक एक मन हे अकरा घटक एका ठिकाणी एकत्र करणे आणि ते भगवंताच्या सहवासात लिन करणे.

म्हणूनच एकादशीला महत्त्व आहे. आषाढ महिन्यात कर्क संक्रमणाचा काळ सुरू होतो. दक्षिणायनाला प्रारंभ होतो. या काळात विविध प्रकारच्या देवतांची व्रतेही असतात. आषाढातील एकादशीपासून वेगवेगळ्या व्रतांना सुरुवात होते.

आषाढ शुद्ध द्वितीयेला जगन्नाथाची रथयात्रा असते. कृष्ण आणि बलराम मथुरेस गेल्याबद्दल हा उत्सव सुरू असतो. त्यांची बहीण सुभद्रा रथाबरोबर आहे. ही रथयात्रा आषाढ शुद्ध दशमीला पूर्ण होते.

आषाढी एकादशीला महाएकादशीही म्हणतात. भागवत धर्माचे आद्यपीठ असलेले श्रीक्षेत्र पंढरपूर हे एकादशीचे महत्त्वाचे स्थान आहे. संत तुकारामांचा यासंदर्भात एक अभंग आहे. ते म्हणतात…

देह ही पंढरी आत्मा पांडुरंग|
करीतसे संग अहर्निशी॥
मन पुंडलिक आवरोनी धरा|
तेणे होय सोयरा पांडुरंग॥
चौर्याशी देहाची करूनीया वीट|
विटेवरी नीट उभा असे ॥
तुका म्हणे लक्ष लावुनी अंतरी !
तोची वारकरी पंढरीचा॥

पंढरीची वारी म्हणजे चिंतनाची आणि मननाची पर्वणी आहे. प्रपंच आणि परमार्थ याचा उत्कृष्ट मिलाङ्ग वारकरी संप्रदायात असल्याने वारकरी संप्रदाय प्राधान्याने वैष्णवांचा संप्रदाय आहे.

आषाढी एकादशीला पंढरपुरी गेल्यावर वारकर्‍यांना होणारा आनंद शब्दातीत असतो. वारीला जाणारा भक्त काहीही मागत नाही कारण न मागताच त्याला सगळे काही मिळत असते. विठ्ठल ओळखणारा आहे. त्याला कळते. चंद्रभागेच्या तळाच्या काठी पुंडलिक माता-पित्यांची सेवा करतो. तीच खरी वारकर्‍यांची भक्ती. तुकाराम महाराज म्हणतात…

तुका म्हणे मायबापे|
अवघी देवांची स्वरुपे॥
माय बापे केवळ काशी |
तेणे न वजावें तीर्थासी॥
पुंडलिके काय केले| परब्रह्म उभे ठेले॥

समाजात आजही काही घरे अशी आहेत जिथे मुले पुंडलिक होऊन त्यांची सेवा करतात. पंढरीच्या वारीतील हा संस्कारही जोपासण्यासारखा आहे. विठ्ठल या देवतेचे हेच खरे सामर्थ्य आहे. तो सगळ्यांचा लाडका आहे.

विठ्ठल कधीही कोणावरही रागावलेला, कोपलेला नाही. संत जनाबाई त्याला कपडे धुवायला लावते, तर संत सखू त्याला भांडी घासायला लावते. संत कान्होपात्रेबरोबर खेळतो. संत ज्ञानोबांचा हात धरून पुढे जातो. संत निवृत्तीनाथांबरोबर संवाद करतो, संत गोरा कुंभाराबरोबर मातीचे घटही बनवतो.

संत संताजींना पावसाळ्यात चंद्रभागा दुथडी भरल्यानंतर स्वतः नाव घेऊन सोडवतो. आपला भाव स्वच्छ असेल तर कोणताही चांगला माणूस आपल्या उपयोगी पडतो तोच आपला विठ्ठल असतो. तेच आपले रूप असते.

तुकोबाराय म्हणतात….
पंढरीची वारी जयाचेही घरी|
त्याची पायधुळी लागो मज॥
ज्ञानोबा म्हणतात…
माझी जीविची आवडी|
पंढरपुरा नेईन गुढी|
गोविंदाचे गुणी वेधिले | पांडुरंगी मन रंगले ॥

उपचार, पुराण, पोथी, नैवेद्य, सोवळेओवळे असे काहीही वारीत नसते. आषाढी वारी ही महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पसरली आहे.
संत गाडगे महाराजांनी वारी ही प्रबोधनाची वारी असली पाहिजे, असे सांगितले.

तुकडोजी महाराजांनीही वारीतून भजनाचा प्रसार करून सगळ्यांना एकात्म भावाचे शिक्षण दिले. ज्ञानोबांचे पसायदान तर विश्‍वात्मकच आहे. संतांच्या शिकवणीनुसार वारी हे गृहकर्तव्य आहे.

त्यामुळेच आज पिढ्यान् पिढ्या वारी सुरू आहे. वर्षातलेे ३५० दिवस आपला संसार आहे मात्र १५ दिवस आपण पांडुरंगाचे आहोत, हा वारकर्‍यांचा भाव असतो. वारकरी पंथाने प्रपंच हाच पांडुरंग मानला आहे. ते तुकोबा म्हणतात…

नामसंकीर्तन साधन पैं सोपें |
जळतील पापें जन्मांतरें॥
न लगे सायास जावें वनांतरा |
सुखें येतो घरा नारायण ॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त |
आवडी अनंत आळवावा ॥
रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा|
मंत्र हा जपावा सर्वकाळ॥
याहूनि आणीक नाहीं पैं साधन |
वाहातसें आण विठोबाची ॥
तुका ह्मणे सोपें आहे सर्वांहूनि |
शाहाणा तो धणी घेतो येथें ॥
एक दुसरा अभंग आहे
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |
भेदाभेदभ्रम अमंगळ|
भेदाभेद भ्रम अमंगळ॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर|
वर्म सर्वेश्‍वरपूजनाचे॥

थोडक्यात, आपल्या जगण्याने कोणालाही कशाही प्रकारचा त्रास होऊ नये. यासंदर्भात ज्ञानोबांची उपमा खूप सुंदर आहे. ते म्हणतात, मुंगीच्या पायातील चाळ ऐकता आला पाहिजे, इतके मन संवेदनशील असायला हवे.

ही संवेदनशीलता म्हणजे प्रपंचातील जगणे आहे. किती जगतो याला महत्त्व नाही तर मन किती संवेदनशील आहे हे महत्त्वाचे आहे. ही संवेदनशीलता वारी शिकवते.

आषाढी एकादशीनंतर काला असतो. काला म्हणजे सामाजिक एकता. सामाजिक समरसतेचे, एकतेचे तत्त्व काल्याइतके कुठेही नाही. काला म्हणजे विशिष्ट चिंतन काळानंतर दिलेला प्रसाद. द्वादशीला काला ङ्गुटतो. रात्रभर गवळणी म्हटल्या जातात, प्रवचने, कीर्तने, निरुपणे होतात.

आपली वृत्ती सदाचारी राहो आणि क्रियाशील राहो, हा या सर्वाचा भावार्थ. ज्ञानदेवांना सज्जन निष्क्रीय आवडत नाहीत. सज्जन हा क्रियाशील असला पाहिजे. ते म्हणतात…

अवघाचि संसार सुखाचा करीन |
आनंदे भरीन तिन्ही लोक ॥

संतांनी प्रपंच विन्मुख राहा असे कधीच सांगितले नाही. संसाराइतका आनंद दुसरा कुठेच नाही. त्यातही विठ्ठल मिळवता येतो. त्यामुळे आषाढ वारी हे एक वेगळे संचित आहे. त्या संचिताचा भाव आपल्या जगण्यामध्ये आणू शकलो तर त्या भावाला आपण आणखी वेगळा आयाम देऊ शकतो.

हा आयाम अधिक चांगल्या प्रकारे आला तर एकमेकांशी वितुष्ट येणार नाही, सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतील. हे ऐक्य सदासर्वकाळ राहावे. तुकोबा म्हणतात, आम्हाला विठ्ठल चिंतनाने जे मिळाले तेच आमचे सर्वस्व आहे. म्हणून या काळात विविध व्रत, उत्सव, लोककथा, सणवार होत असत.

हे सर्व वैभव आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यांपर्यंत होते. त्यामुळे आषाढी एकादशीला विठ्ठलाचा आशीर्वाद घेताना तुझ्या चरणांनी उभे राहू, असे म्हणतात.

सरतेशेवटी माणसाचे व्यक्तीत्व स्वच्छ पायावरच तर उभे असते. तो पाया विठ्ठलभक्ती आहे. वारीत एकमेकांना माऊली म्हणून प्रत्येकाच्या अंतरंगातील विठ्ठल जागवला जातो आणि त्याला नमस्कार केला जातो.
हे माऊली तत्त्व म्हणजे वारीचा प्राण आहे.

– डॉ. यशवंत पाठक

LEAVE A REPLY

*