बोदवडला कापसाच्या मापात पाप : व्यापारी पोलिसांच्या ताब्यात

0

बोदवड ।  प्रतिनिधी :  तालुक्यातील वरखेडे येथे चाळीसगाव येथील व्यापारी गेल्या 8-10 दिवसांपासून कापूस खरेदी करित आहेत. मात्र आज हे व्यापारी मापात पाप करतांना पकडले गेले. ज्यादा कापूस मोजून शेतकर्‍यांना लुटणार्‍या या टोळीला गावकर्‍यांनी बोदवड पोलिसात आणले. मात्र बर्‍याच उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील काही व्यापारी कापूस खरेदी करण्यासाठी परिसरात फिरत होते. कापसाला प्रति क्विंटल साडेपाच हजार भाव मिळत असल्याने शेतकरी त्यांना कापूस विकण्यासाठी गर्दी करित होते. हेच व्यापारी मागील वर्षीच्या हंगामातही कापूस घेण्यासाठी आल्यामुळे त्यांच्यावर शेतकर्‍यांचा विश्वास होता. त्यामुळे आतापर्यंत सर्व व्यवस्थित सुरू होते. मात्र या व्यापार्‍यांच्या तराजू काट्यातील कलाकारी आज शेतकर्‍यांच्या लक्षात आल्याने या लबाड व्यापार्‍यांना शेतकर्‍यांनी पोलिस ठाण्यात आणले.

…अशी करायचे लबाडी 

बहुतेक शेतकरी शेतातून कापूस आणल्यानंतर मोजून घरात साठवून ठेवल्याने वजनात मात्र काही प्रमाणात घट होत असते. हे शेतकर्‍यांना माहिती असते म्हणून कापूस अपेक्षेपेक्षा कमी मोजला गेला, तर घट झाल्याची समजूत करून शेतकरी गप्प बसत होता. परंतु आज या व्यापार्‍यांची लबाडी शेतकर्‍यांच्या लक्षात आली. या लबाड व्यापार्‍यांचा कापूस मोजण्याचा जो तराजु काटा आहे तो बिजागरी असणारा आहे.

या बिजागरीला एक बारीक पिन लावलेली आहे. काट्यामध्ये कितीही कापूस भरला तरी तो खाली येत नव्हता, बिजागरीच्या पिनजवळ हात ठेवून एक व्यापार उभा असायचा, त्याने पिन दाखल्यानंतरच काटा खाली येत असे, म्हणजे 40 किलोचा कापसाचा तोल करतांना साधरणपणे 50 ते 55 किलो कापूस भरला जायचा आणि 55 किलाऐवजी 40 किलोचेच पैसे शेतकर्‍यांना मिळत होते. काट्याची पिन दाबातांना एका चाणाक्ष शेतकर्‍याचे लक्ष गेल्याने हा सारा मापात पापाचा प्रकार उघडकीस आला.

तात्काळ नुकसान भरपाई ः अनिल पाटील 

गेल्या 10 दिवसांच्या कार्यकाळात एकट्या वरखेडे गावात या लबाड व्यापार्‍यांनी सुमारे 70-75 क्विंटल कापूस शेतकर्‍यांची फसवणूक करून लाटला. पोलिसात तक्रार दाखल व्हावी, अशी आमची इच्छा आहे, मात्र व्यापार्‍यांनी लुटलेला पैसा शेतकर्‍यांना नुकसान भरपाईच्या स्वरूपात तात्काळ मिळावा, अशी ही भुमिका काही शेतकर्‍यांनी घेतल्याने तक्रार दाखल होणेकामी विलंब होत आहे. अशी माहिती बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा वरखेडे येथील रहिवासी अनिल पाटील यांनी दिली.

मालक पसार; मजुर जेरबंद 

वरखेडे ग्रामस्थांनी व्यापार्‍यांना लबाडीचा जाब विचारण्याच्या प्रयत्न केल्यानंतर प्रकरण अंगाशी येण्याच्या भितीने व्यापार्‍यांनी आपला ट्रक व गाडी घेवून पलायन केले. त्यात शेतकर्‍यांचा कापूसही होता. 12 जणांपैकी 4 जण शेतकर्‍यांच्या हाती लागले. या चार जणांना बोदवड पोलिसात आणल्यानंतर त्यांनी आपण मजूर असल्याचे सांगितले.
कापसाच्या मापात पाप होत असल्याचा प्रकार दुपारी 12 वाजेपर्यंत लक्षात आला, तरी सायंकाळी 7 वाजेपर्यंतही गुन्हा दाखल झाला नव्हता.

नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी काही शेतकरी करित असल्याने संबंधित व्यापारी तडजोडी अंती प्रकरण मिटविण्याच्या प्रयत्नात असल्याचेही काही जण बोलत होते. गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याने ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे देण्यास पोलिसांनी नकार दिला.

LEAVE A REPLY

*