फिल्म स्टार ‘वळू’चे वृद्धापकाळाने निधन

0
सांगली | वृत्तसंस्था :  ‘वळू’ या मराठी चित्रपटात खलनायकाची भूमिका बजावून संपूर्ण चित्रपटात लक्षवेधी ठरलेल्या डूरक्या अर्थात वळूने अखेरचा निरोप घेतला. सांगलीच्या पांजरपोळमध्ये वाढलेल्या वळूचे वृद्धापकाळाने निधन झाले.

पुरातन काळापासून पांजर पोळ अस्तित्वात आहे. या ठिकाणी अनेक गाई आणि वळू यांचे संगोपन केले जाते. सांगलीतील आराध्य दैवत गणपती मंदिराच्या शेजारी हे पांजरपोळ आहे. येथे मोठ्या संख्येने गाई आहेत. याच पांजरपोळमध्ये १० वर्षांपासून एक वळू राहत होता. या वळूने टक्करीमध्ये नावलौकिक मिळवला होता.

२००८ साली वळू या चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी वळूचा शोध सुरू झाला. सुमारे ३०० वळूच्या शोधानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाला सांगलीचा वळू सापडला. भरदार शरीरयष्टी, काळा रंग आणि नजरेमध्ये आक्रमकता अशा स्वभावाचा वळू मिळाल्यानंतर ’वळू’च्या चित्रपटाला सुरवात झाली.

विशेष म्हणजे या चित्रपटासाठी सांगलीचा हा डूरक्या अर्थात वळूने चांगलेच सहकार्य केले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटातील दिग्गज अभिनेत्यांच्या भूमिकेपेक्षा सांगलीच्या वळूची भूमिका दर्जेदार ठरली आणि प्रेक्षकांच्या मनात या सांगलीच्या वळूने घर केले.

अशा या वळूचा सोमवारी वृद्धपकाळाने मृत्यू झाला. या वळूचे दात गेल्याने त्याला गेल्या महिनाभरापासून काहीच खाता येत नव्हते. शिवाय त्याचे वय ही झाले होते. अशात पांजरपोळ संस्थेच्या सेवकांनी त्यास वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, वळूने अखेरचा निरोप घेतला. त्याचे हे एक्झिट पांजरपोळमधील सर्वांना त्याचबरोबर सांगलीकरांच्या मनाला चटका लावणारे आहे.

दरम्यान, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित वळू या चित्रपटात अतुल कुलकर्णी, मोहन आघाशे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, निर्मिती सावंत, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, नंदू माधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

LEAVE A REPLY

*