अमळनेर नगरीत ६ मे रोजी निघणार संत सखाराम महाराजांचा रथोत्सव

0
राजेंद्र पोतदार | अमळनेर : वैशाख शू एकादशीला म्हणजे उद्या शनिवार दि ६ रोजी अमळनेरच्या संत सखाराम महाराजांचा रथोत्सवाचे मोठ्या भक्तीभावात आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून वर्षभर वाडी मंदिराजवळ उभ्या असलेल्या या रथाची स्वच्छता करून त्यास तेलपाणी देण्यात आले. सायंकाळपर्यंत या रड़स फुलांच्या माळांनी सजविण्यात येणार आहे. रथाच्या मार्गात आतापर्यंत बदल नाही.

अशी आहे परंपरा

संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. हा रथ अतिशय उंच असून, तो मलबार सागाच्या लाकडापासून बनविलेला  आहे. अमळनेरच्या रथोत्सवाला जवळपास दोनशे वर्षांची परंपरा आहे.

वाडी संस्थानचे दुसरे गादी पुरुष गोविंद महाराज यांनी १८१९ मध्ये रथोत्सवाची परंपरा सुरू केली. त्यावेळी पहिला रथ तयार करण्यात आला होता. त्यानंतर वाडी संस्थानचे दुसरे गादी पुरुष बाळकृष्ण महाराज यांनी नवीन रथ तयार केला.
हा रथ मलबार सागाच्या लाकडापासून तयार केलेला आहे.

दोन चाकांच्या मधील आख अंजनाच्या लाकडापासून बनविलेले आहे. हा रथ बाळकृष्ण महाराजांनी तयार केलेला असल्याने, त्यावर बाळकृष्ण महाराज, गुरुकृष्ण असे लिहिलेले आहे. रथावर श्री गणेश, मारुती आदी देवतांच्या मूर्ती आहेत.

हा रथ अतिशय उंच असला तरी त्याची नेमकी उंची कोणीही मोजलेली नाही. रथ निघण्याच्या काही
दिवस अगोदरच रथाची दुरुस्ती केली जाते. हे काम दरवर्षी होत असते.रथाला नाड्याने ओढण्याची परंपरा : या रथाला पूर्वीपासूनच नाड्याने ओढण्याची परंपरा आहे.

सर्व जातीधर्माचे लोक या उत्सवात सहभागी होत असतात. सायंकाळी निघतो रथ : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देवतांचे रथ निघत असतात. मात्र बहुतांश रथ हे सकाळीच निघत असतात.

परंतु अमळनेरातील रथ हा सायंकाळी मुहूर्त बघूनच काढण्यात येत असतो. प्रथम रथ पश्चिम दिशेला वळविला जातो. त्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे हा रथ जात असतो. रथावर श्री लालजींची हातात धनुष्यबाण घेतलेली मूर्ती स्थापन केली जाते.

पहिली मोगरी मुस्लीम बांधवांकडूनच

या रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान हा मुस्लीम समाजाकडे परंपरेने आहे. मार्गात बदल नाही : रथोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र त्याच्या मार्गात एकदाही बदल झालेला नाही.

वाडी संस्थानातून निघणारा रथ सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशीपूल पैलाडमार्गे वाडीत येतो. पूर्वी पहाटे अडीच-तीन वाजताच रथ वाडीत यायचा. मात्र आता आरत्या वाढल्याने, रथ संस्थानात पोहचण्यास सकाळ उजाडत असते.

LEAVE A REPLY

*